एम्सच्या डॉक्टरांचे मत
लहान मुलांमध्ये आढळणाऱ्याकर्करोगाचे निदान लवकर झाल्यास ७० ते ८० टक्के रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात. मात्र त्याबाबत असलेले अज्ञान आणि रोगाचे उशिरा झालेले निदान यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे मत एम्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
एम्सच्या बालरोगचिकित्सक डॉ. रिचना सेठ यांच्या मते, आजाराची लक्षणे ओळखण्यात पालकांना आलेल्या अपयशामुळेच कर्करोगाचे निदान उशिरा होते. यासाठीच जनजागृतीवर अधिक भर देण्याची गरज असून बालवयातही कर्करोग होऊ शकतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या दुर्लक्षामुळेच हा आजार अधिक घातक ठरत असल्याची अनेक उदाहरणेदेखील देण्याची नितांत गरज आहे. सेठी यांच्या मते, वर्षांला साधारण ५० हजार लहान मुलांना कर्करोग झाल्याचे निदान होत असून दरवर्षी कर्करोगाने पीडित ३०० ते ३५० मुलांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते.
सतत ताप असणे, वजन कमी होणे, शरिराच्या काही भागात गाठी तयार होणे आणि शरिरातील कोणत्याही प्रकारच्या वेदनेकडे दुर्लक्ष करणे घातक असून तज्ज्ञांच्या मते ही लक्षणे कदाचित कर्करोगाचा पहिला टप्पा असू शकतो, तर लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये तीव्रतेने पसरणारा रक्तपेशीचा किंवा रक्ताचा कर्करोग, मेंदूच्या गाठी, मूत्रपिडांना होणारा कर्करोग आणि दृष्टिपटलातील पेशींचा किंवा डोळ्याचा गाठीचा कर्करोग सर्वसाधारणपणे आढळत असल्याचे माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिली.
भारतात बहुतांश पालकांमध्ये असलेल्या अज्ञानासोबतच प्रत्यक्षपणे मुलांमधील आजारांची गंभीर लक्षणे दिसल्यानंतरच त्यांना उपचारासाठी आणले जात असल्याचे डॉ.सेठी यांनी सांगितले, तर या आजारातून उपचारानंतर बाहेर पडण्याची क्षमता ही मोठय़ापेक्षा लहान मुलांमध्ये अधिक असून त्यांच्या आरोग्यातील बदलांबाबत सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer rate increase by lack of knowledge