न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांचे संशोधन

दारूचे व्यसन हे वाईटच! त्यामुळे अनेकांना आर्थिक व सामाजिक ऱ्हासाला सामोरे जावे लागतेच, त्याशिवाय अनेक शारीरिक व्याधी जडतात. मद्य प्राशनाने कर्करोग होऊ शकतो, असा दावा आता न्यूझीलंडच्या संशोधकांनी केला आहे. न्यूझीलंडमध्ये २०१२मध्ये ८० वर्षांखालील २३६ लोकांचा मृत्यू कर्करोगाने झाला. त्याला मद्यसेवन कारणीभूत होते, अशी माहिती ओटॅगो विद्यापीठाच्या या संशोधकांनी दिली.
अल्कोहोलचे सेवन हे कर्करोग होण्याला कारणीभूत असल्याचे यापूर्वी केलेल्या विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. ओटॅगो विद्यापीठाच्या या संशोधकांच्या मते न्यूझीलंडमध्ये अनेकांना केवळ मद्यसेवनाने कर्करोग झाला आहे. स्तनांचा, आतडय़ाचा, तोंड, घसा, अन्ननलिका आणि यकृताचा कर्करोग मद्यसेवनाने होतो, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
ओटॅगो विद्यापीठातील वैद्यकीय अभ्यास विभागातील प्राध्यापक आणि या संशोधकांच्या गटाचे प्रमुख जेनी कॉनर यांच्या मते, संशोधकांनी २००७ आणि २०१२ दरम्यान झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता साधारण ६० टक्के महिलांचा मृत्यू हा स्तनाच्या कर्करोगामुळे झाला आहे. त्याला मद्यसेवन कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. २००७मध्ये ७१ आणि २०१२मध्ये ६५ महिलांचा मृत्यू स्तनांच्या कर्करोगाने झाला. या महिला दिवसातून दोन ते तीन वेळा मद्य प्राशन करत असल्याचे आढळले आहे.
‘जर्नल ड्रग अँड अल्कोहोल’ या नियतकालिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)