मॅनोज शर्करा या पोषक घटकामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांमधील गाठींच्या वाढीचा वेग कमी होऊन केमोथेरपीचे परिणाम अधिक चांगले मिळू शकतात, असे उंदरांवर केलेल्या प्रयोगांत दिसून आले आहे. ‘नेचर’ या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. कर्करोगावरील उपचारांत मॅनोजचा वापक कसा करता येईल, हे समजून घेण्याचा मार्ग या संशोधनातून सुकर होणार आहे.

शरीरातील सर्वसाधारण निरोगी ऊतींपेक्षा कर्करोगाच्या गाठी अधिक ग्लुकोज (शर्करा) वापरतात. परंतु केवळ आहाराद्वारे आपल्या शरीरातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवणे शक्य नाही. कर्करोगग्रस्त पेशींचा साखरेचा वापर कमी करण्यासाठी ग्लुकोजच्या प्रक्रियेत मॅनोज हे परिणाम घडवून आणू शकते, असे इंग्लंडमधील ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधकांना आढळून आले आहे.

या विद्यापीठातील प्रो. केविन रायन यांनी सांगितले की, कर्कगाठींच्या वाढीसाठी मोठय़ा प्रमाणावर ग्लुकोज लागते. त्यामुळे त्यांना होणारा ग्लुकोजपुरवठा मर्यादित करून कर्करोगाच्या वाढीचा वेग कमी करता येईल. यात एकच अडचण आहे. ती म्हणजे शरीरातील सर्वसाधारण निरोगी पेशींनाही ग्लुकोजची गरज असते. त्यामुळे शरीरातून आपण ते पूर्णपणे काढून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

या संशोधनात कर्कपेशींची वाढ थांबवू शकेल इतपत मॅनोजची मात्रा निश्चित करण्यात आली. इतक्या मात्रेमुळे सामान्य निरोगी पेशींच्या वाढीवरही दुष्परिणाम होत नाही. हा ताळमेळ उत्कृष्टपणे साधल्यामुळे भविष्यात रुग्णांमध्ये केमोथेरपीचे परिणाम वाढवण्यासाठी मॅनोज देता येईल. याचा त्यांच्या प्रकृतीवरही दुष्परिणाम होणार नाही, असा दावा रायन यांनी केला.