मैत्रीच्या नात्याला प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. अनेकजण आपल्या जीवाभावाच्या मित्रासाठी काहीही करायला तयार असतात. यामध्ये, मित्राला त्याच्या गरजेच्या काळात पैसे देण्याच्या गोष्टीचाही समावेश होतो. मात्र, मदत म्हणून दिलेले हे पैसे आपल्याला प्रत्येकवेळी परत मिळतीलच अशी खात्री नसते. काहीजण हे पैसे परत करायला टाळाटाळ करतात. मैत्रीसाठी आपण बरेचदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण या गोष्टी आपल्या मनात राहतातच. अशा काही टिप्स आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्राला दिलेले पैसे, त्यांना वाईट न वाटता परत मागू शकता. या टिप्स कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- मित्रांना तुमची समस्या सांगा
मित्राला दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी कोणतेही खोटे कारण न देता त्यांना तुमची समस्या नीट समजावून सांगा. तुम्हाला खरोखरच तातडीने पैशांची गरज असेल, तर तुमच्या मित्राला भेटून त्यांच्याशी सविस्तर बोला. अशा पारिस्थितीत तुमचे मित्र तुमची समस्या नक्कीच समजून घेतील आणि तुम्हाला तुमचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करतील.
Health Tips : तुम्हालाही खूप राग येतो? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या बचावाच्या पद्धती
- दिलेल्या रकमेचा एक हफ्ता ठरवा
जर तुमच्या मित्राला एकाचवेळी सगळे पैसे देणे शक्य नसेल, तर तुम्ही त्यांना एक हफ्ता ठरवून द्या. यामुळे तुम्हाला तुमचे पैसे विशिष्ठ कालावधीमध्ये परत मिळण्यास मदत होईल. तसेच, तुमच्या मित्रालाही रकमेचे ओझे सहन करावे लागणार नाही.
- मित्राची एखादी मौल्यवान गोष्ट तुमच्याकडे गहाण म्हणून ठेवा
जर तुम्ही तुमच्या मित्राला एखादी मोठी रक्कम कर्ज म्हणून देत असाल, तर तुम्ही त्यांची एखादी मौल्यवान वस्तू तुमच्याकडे हमी म्हणून ठेवू शकता. यामुळे तुम्हालाही मित्राकडून पैसे परत मिळण्याची खात्री राहील आणि तुमच्या मित्राला तुम्हाला पैसे परत करावेच लागतील.
- याविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तींशी किंवा कुटुंबियांशी बोला
जर तुमचा मित्र जाणूनबुजून पैसे परत करत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही घरातील सदस्यांकडून किंवा तुमच्या कॉमन फ्रेंडकडून शिफारस मिळवू शकता. यामुळे तुमचा मित्र अनेक लोकांच्या सांगण्याने कंटाळून कर्जाची परतफेड करेल आणि तुम्हाला कर्ज परत मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत.