हल्ली आपल्याकडे घरांमध्ये पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढले असले तरी बरेचदा या प्राण्यांच्या पोषणाबद्दल किंवा खाण्याच्या सवयींबद्दल प्राणीप्रेमींमध्ये अनेक गैरसमज असतात. त्यातही खाण्याच्याबाबतीत लहरी आणि अनेक आवडीनिवडी असलेली मांजर पाळत असाल तर हा प्रश्न अधिकच अवघड होतो. प्राण्यांच्याबाबतीतील अशाच गैरसमजुती किंवा अज्ञानामुळे त्यांना चुकीचे खाणे दिले जाते. त्याचा परिणाम मांजरांचा शारीरिक विकासावर तर होतोच आणि त्यांच्यामध्ये प्रकृतीच्या अनेक समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मांजरांना खाण्यापिण्याच्या सवयींबाबत पुढील गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
खाण्याची आणि प्रेमाची गल्लत करू नका- तुमच्या मांजरीच्या वयाप्रमाणे तिला साधारण किती खाणे लागेल, यासाठी तुम्ही एखाद्या पशुवैद्यकाचा सल्ला घेतला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तु्मच्याकडे असणारा प्राणी तुम्हाला कितीही प्रिय असला तरी खाण्याची आणि प्रेमाची कधीही गल्लत करू नका. मांजरांच्याबाबतीत हीच चूक महागात पडू शकते. जास्त खायला दिल्यामुळे मांजरी लठ्ठ होऊन त्यांना संधिवात किंवा डायबेटीससारखे विकार जडू शकतात.
शाकाहाराची सक्ती करू नका- तुम्ही शाकाहारी असाल म्हणून तुमच्या मांजरीनेही शाकाहारी व्हावे, असा तुमचा आग्रह असेल तर ती घोडचकू ठरेल. कारण, मांजर हा प्राणी निसर्गतच मांसाहारी आहे. मांजरीच्या शारीरिक वाढीसाठी लागणाऱ्या अनेक पौष्टिक घटकांची कमतरता मांसाहारी पदार्थांमुळे भरून निघते. मांसाहाराअभावी मांजरांमध्ये आंधळेपणाची किंवा हद्यरोगाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात मांसाहार वर्ज्य असेल तरी तुम्हाला मांसाहारी घटकांचा समावेश असलेले पॅकेटबंद खाणे बाजारात सहजपणे मिळू शकते.
पाणी- मांजरींना पाण्याची गरज नसते हा एक मोठा गैरसमज आहे. अन्य प्राण्यांप्रमाणेच मांजरांनाही पिण्यासाठी पाणी लागते. मात्र, अनेकांना वाटते की दुध किंवा इतर ओलसर अन्नातून मांजरांची पाण्याची गरज भागते. मात्र, हे साफ चुकीचे आहे. मांजरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी लागते. याशिवाय, पिण्याच्या पाण्यात मांजरांना आकर्षित करणारी कॅटनिपची पाने टाकल्यास मांजरे जास्त पाणी पितात. तसेच मांजरांचा लहरी स्वभाव लक्षात घेता घरातील त्यांच्या आवडत्या जागांजवळ पाणी असेल याची काळजी घ्यावी. मांजरांना शक्यतो वाहते पाणी प्यायला आवडते. नळातून येणाऱ्या पाण्याला क्लोरिनचा वास असतो, मांजरांची घाणेंद्रिये तीक्ष्ण असल्याने त्यांना हा वास लगेच कळतो. त्यामुळे जमल्यास त्यांच्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घ्यावे.
खाण्यात लसूण देणे टाळावे- मांजर किंवा कुत्र्यांना लसुण खायला आवडते हा आपल्याकडे असलेला आणखी एक गैरसमज आहे. फक्त इटालियन खाद्यपदार्थ वगळता मांजरांना लसणापासून लांब ठेवलेले केव्हाही चांगलेच.
सुके आणि ओलसर खाद्यपदार्थ- मांजरींना फार कमी प्रमाणात तहान लागत असल्यामुळे त्यांच्या आहारात फक्त सुक्या अन्नपदार्थांचा समावेश करून चालत नाही. त्यामुळे मांजरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण असंतुलित होऊ शकते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्यांना मुत्रमार्गाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आहारात ओलसर खाद्यपदार्थांचा समावेश करावा.
याशिवाय, तुमच्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना अधुनमधून पशुवैद्यकाकडे नेऊन त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.