सततच्या मोबाईल फोनच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होऊन, त्यांच्यातील उत्साह कमी होत असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या एका अभ्यासातून सिध्द करण्यात आले आहे. परिणामी वाढलेल्या चिंतेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सरळ परिणाम होत असल्याचा दावा या अभ्यासातून करण्यात आला आहे. निरूत्साह आणइ चिंता विद्यार्थ्यांच्या परीक्षांमधील गुणांवर परिणाम करत असल्याचे संशोधकांनी म्हटले  आहे.    
अमेरिकेतील केंट राज्य विद्यापीठाच्या अँड्रीव लिप, जेकब बर्क्ली आणि आर्यन कार्पिन्स्की यांनी या अभ्यासादरम्यान विद्यापीठांमधून शिक्षण घेत असलेल्या ५०० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले.    
रोजच्या मोबाईल फोनच्या वापरामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त होत असून, त्यांच्यामध्ये असमाधानीपणा बळावत आहे. परिणामी या विद्यार्थ्यांच्या जीवनात उदासीनता वाढली असल्याचा दावा संशोधकांनी या अभ्यासामधून केला आहे. या अभ्यासा दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांचे विद्यापीठांकडील सर्व प्रकारचे अहवाल, परीक्षांचे निकाल व माहिती पडताळण्यात आली.     
या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेले सर्व सहभागी विद्यार्थी पदवीच्या अभ्यासक्रमाचे होते.   
“विद्यार्थ्यांना गरजेपुरताच मोबाईल फोनचा वापर करण्यास प्रोत्साहण देणे गरजेचे आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराने त्यांच्या अभ्यासावर होणाऱ्या वाईट परिणामांची जाणीव करून दिल्यास निश्चितच विद्यार्थी त्यापासून प्रवृत्त होतील. सतत मोबाईलवर बोलण्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्य व मानसिकतेवर होत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निराशा वाढत आहे,” असे संशोधक म्हणाले. मानवी वर्तनुकीवर भाष्य करणाऱ्या नियत कालिकामध्ये हा अभ्यास प्रसिध्द करण्यात आला आहे.     

Story img Loader