केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती
केंद्र सरकारने कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी पाहता देशात कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी कर्करोगावरील मार्गदर्शनपर २० संस्था आणि ५० प्रांतवार कर्करोग केंद्रांच्या उभारणीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकसभेत याविषयीच्या एका चर्चासत्रात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी ही माहिती दिली. या वेळी आरोग्यमंत्र्यांनी कर्करोगामुळे भारतात वर्षांला पाच लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीदेखील लोकसभेत दिली. त्याचबरोबर या आजारामुळे वयोमानानुसार मृत झालेल्यांचा अधिकृत आकडा सरकारकडे नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे. भारतात पुरुषांमध्ये तोंडाच्या आणि पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते, तर महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. याच अनुषंगाने केंद्राकडून कर्करोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशस्तरावर कर्करोगाविरोधातील योजना अमलात आणण्यात येणार आहे. यासाठी आखण्यात आलेल्या योजनेला २६ राज्य आणि केंद्रअखत्यारित आरोग्य केंद्राकडून अशा ४७ अर्जाची छाननी प्रक्रिया केंद्राकडून करण्यात आली आहे. त्यापैकी १३ राज्यांमधील १४ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून सात ठिकाणी कर्करोगासाठीच्या संस्था आणि अन्य सात ठिकाणी प्रांतवार केद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेसाठीचा निधीदेखील केंद्राकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अन्य प्रस्तावांबाबतदेखील संबंधित राज्यांशी केंद्राकडून समन्वय साधला जात आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Story img Loader