लहान मुलांना किटाणूजन्य विकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. किटाणूजन्य विकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले असून त्यासाठी विशेष मोहीमही आखण्यात आली आहे. देशभरातील २७ कोटी बालकांना या विकारांच्या प्रादुर्भावासपासून रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तेलंगणात झालेल्या ‘राष्ट्रीय किटाणूनाशक दिन’ कार्यक्रमाप्रसंगी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या २७ कोटी मुलांपैकी १९ कोटी मुले शाळांमध्ये जात आहेत. त्यामुळे शाळांमध्ये या विकारांपासून रोखण्यासाठीच्या ४०० मिलीग्रॅमच्या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री जे. पी. नड्डा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
गेल्या वर्षी राजस्थानमध्ये ‘राष्ट्रीय किटाणूनाशक दिन’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आणि १० राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातील जवळपास ८९.९ दक्षलक्ष मुलांपर्यंत हे विकार रोखण्यासाठी औषधांचे वाटप करण्यात आले. यंदा २७ कोटींचे उद्दिष्ट आखण्यात आले असून हा कार्यक्रम सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार आहे. जर २७ कोटीपर्यंत पोहोचण्याचे हे लक्ष्य गाठण्यात यश आले तर भारत नक्कीच ‘आरोग्यदायी’ देश म्हणून ओळखला जाईल आणि आपली युवा पिढीही तंदरुस्त असेल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. नड्डा यांच्या मते, हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विविध भागधारकांच्या सहकार्याने नक्कीच यशस्वी होईल आणि लोकांच्या आरोग्याशी निगडित या आरोग्यमय कार्यक्रमातून आमचे धैर्य गाठण्यात यशस्वी होऊ, असेही त्यांनी सांगितले.
जगभरात होणारे संसर्गजन्य आजारांमध्ये परजीवी कृमी किंवा मातीतून प्रसार होणाऱ्या कृमी(एसटीएच)चा प्रादुर्भाव अधिक असतो. जगातील १.५ अब्जपेक्षा जास्त लोकसंख्येपैकी २४ टक्के लोकसंख्या ही कृमीच्या संक्रमणाने ग्रस्त असल्याचे अधिकृत माहितीतून नमूद करण्यात आले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Story img Loader