तुम्ही अद्याप आधारकार्ड लिंक केलं नाहीये का? नसेल तर लवकरात लवकर आधारकार्ड तुमच्या बँक खात्याशी, पॅन कार्डशी, मोबाईल सीम कार्डशी आणि इतर अन्य सरकारी सेवांशी लिंक करुन घ्या. त्यासाठी काही महत्वाच्या तारखा  संबंधीत खात्याने जाहीर केल्या आहेत. कशासाठी कोणती डेडलाइन आहे जाणून घेऊयात…

बँक खाते

तुमचे बँक खाते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुमच्या हातात केवळ २६ दिवस शिल्लक आहेत.

अनेक बँकांनी आधारकार्ड लिंक करण्यासाठी ग्राहकांना वेगळा डेस्क उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्याचा क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन गेल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक होईल. मात्र तुम्ही बँकेचा ‘केवायसी फॉर्म’ भरला नसेल तर तुम्हाला आधी तो भरणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात सगळे मार्गदर्शन तुम्हाला या डेस्कवरील बँक कर्मचारी करतात. तसेच तुम्हाला बँकेत न जाताही आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करता येईल. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे हे शक्य आहे.

पॅन कार्ड

पॅन कार्डला बायोमॅट्रीक आधारकार्डशी जोडण्याची शेवटची तारीख आहे ३१ डिसेंबर २०१७. यासाठी तुम्हाला आयकर खात्याच्या ई फायलिंग पोर्टलवर तुमचे नाव नोंदवावे लागणरा आहे. एकदा तुम्ही ही नोंदणी केली पुढील प्रक्रिया पार करून तुम्हाला पॅन कार्ड आधारशी लिंक करता येईल.

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

पीपीएफ, एनएससी, केव्हीपी, पोस्ट ऑफिस

पोस्टातील सर्व बचत खाती, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी) या सर्वांशी आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. या वेगवेगळ्या योजनांमधील खातेदारांना ३१ डिसेंबरपूर्वी आपला १२ अंकी आधारकार्ड क्रमांक संबंधित खात्याशी लिंक करवा लागणार आहे. या सर्व योजनांशी आधारकार्ड कसे लिंक करावे याबद्दलची माहिती आधारकार्डच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आधारकार्डच्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सामाजिक योजना

सर्व सरकारी सामाजिक योजनांशी आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. एलपीजी गॅस, केरोसीन सवलतीपासून ते खतांवरील सवलतीपर्यंतच्या तसेच मनरेगा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधीत एकूण १३५हून अधिक सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे बंधनाकारक केले आहे. या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थ्यांनी या योजनांसाठी वापरण्यात येणारी खाती पुढील २६ दिवसांमध्ये आधारकार्डशी लिंक करावी लागणार आहेत.

मोबाईल सीम

मोबाईल सीम कार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची अंतीम तारीख ६ फेब्रुवारी २०१८ आहे.

सरकारने सीम कार्ड लिंक करण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्वांची यादी जाहीर केली आहे. ग्राहकांना वन टाइम पासवर्डच्या (ओटीपी) सहाय्याने सीम कार्ड लिंक करणे शक्य होणार आहे. सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधारकार्ड लिंकींगसाठीचे रिव्हेरिफिकेशन ओटीपीच्या सहाय्याने करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. खास करुन दिव्यांग, आजारी आणि वयस्कर व्यक्तींसाठी ही सेवा ओटीपीच्या माध्यमातून घरपोच सेवेसारखी पुरवण्यात यावी असे सरकारने सांगितले आहे.

म्युच्युअल फंड

सरकारी अधिसूचनेनुसार सर्व म्युच्युअल फंडांचे खाते ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. तसे न केल्यास संबंधीत फंडधारकाचे फोलिओ गोठविण्यात येतील.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदार त्यांचे आधारकार्ड संबंधीत फंडाशी लिंक करण्यासाठी एसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडे किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटची मदत घेऊ शकतात. अनेक म्युच्युअल फंड्स आणि वित्तीय सल्लागार कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन केवायसीची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्याही या संदर्भातील सर्व माहिती मिळवू शकता आणि आपले आधारकार्ड लिंक करु शकता.

Story img Loader