बाळ होणे यापेक्षा आई वडिलांसाठी दुसरी कुठलीच सुखद बातमी नाही. ९ महिन्यांच्या काळजीनंतर जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा आई वडिलांच्या आनंदाला पारावार राहात नाही. पण, पालकत्वासोबत अडचणी आणि आव्हाने देखिल येतात. आर्थिक, मानसिक, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पहिले बाळ झाल्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर काही गोष्टींची खात्री करणे गरजेचे आहे. याने तुमचा पालकत्वाचा प्रवास सुलभ होईल आणि तुमचा ताण नियंत्रणात राहील.
१) आर्थिक घटक
दुसरे मूल जन्माला घालण्याचा विचार करण्यापूर्वी आर्थिक घटकांबाबत विचार करायला हवा. बाळासोबत जबाबदाऱ्या देखिल येतात. म्हणून दुसऱ्या बाळाचा विचार करण्यापूर्वी तुम्ही त्याचा खर्च उचलण्यासाठी तयार आहात का? याबाबत खात्री करा. बाळासाठी लागणारे डायपर्स, खेळणी, कपडे तुमचा खर्च वाढवू शकतात. त्यामुळे, आधी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात की नाही? हे तपासा.
(मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचे करा सेवन, फरक दिसेल)
२) मानसिक आरोग्य
दुसऱ्या बाळाचा विचार तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असेल तर आधी तुम्ही त्याबाबत विचार करा. दुसऱ्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी आपण सध्या तयार नाही, याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते, असे तुम्हाला वाटत असेल तर दुसऱ्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या.
३) तुम्हाला योग्य वाटते तेच करा
दुसरे बाळ जन्माला घालण्यासाठी ही योग्य वेळ नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही. अशा प्रकरणात जोडीदार, मित्र, कुटुंब किंवा समाजाकडून आलेल्या दबावाखाली निर्णय घेणे योग्य नाही. तुम्हाला योग्य वाटते तेच करा.
(वजन कमी करायचे आहे? शिंगाड्याचे असे करा सेवन)
४) वयाचे अंतर
कुटुंब वाढवण्यापूर्वी दोन मुलांच्या वयातील अंतर विचारात घ्या. हा वैयक्तिक निर्णय आहे. पण, मुलांमधील वयाचे थोडे अंतर एकमेकांबद्दलची आपुलकी वाढण्यास मदत करू शकते.
५) पहिल्या मुलाकडे लक्ष द्या
दुसऱ्या बाळासाठी तयारी करत असताना पहिल्या मुलाला भरपूर लाड करायचे विसरू नका. दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी असताना पहिल्या मुलाला आपण वेगळे पडलो, असे वाटू देऊ नका. उलट दुसऱ्या बाळाच्या स्वागतावेळी त्याला उत्साह वाटायला हवा.