अन्नधान्याचे उत्पादन घेताना वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांच्या घातकतेविषयी सावध करणारी बाब व्हिएतनाम युद्धातील अनुभवातून पुढे आली आहे. या युद्धात अमेरिकेच्या विमानांनी व्हिएतनामवर फवारलेल्या ‘एजन्ट ऑरेंज’ नामक विषारी तणनाशकाचे अंश आता ५० वर्षांनंतरही येथील अन्नधान्यांत आढळून येत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.
व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने व्हिएतनामच्या हद्दीतील पर्जन्यवने, पाणथळीच्या जागा आणि शेती होत असलेला भागात २० दशलक्ष गॅलनपेक्षा जास्त तणनाशकाची हवाई फवारणी केली होती. यात डायऑक्सिन मिसळलेल्या घातक एजन्ट ऑरेन्जचा समावेश होता. व्हिएतनामी काँग्रेसच्या योद्धय़ांनी ज्या जंगलांत आश्रय घेतला होता, ती दाट जंगले एजन्ट ऑरेंजमुळे विरळ झाली. तसेच या देशाच्या काही भागांतली पिकेही या तणनाशकामुळे नष्ट झाली. असे असले तरी, या तणनाशकातील डायऑक्सिनमुळे व्हिएतनामी आणि अमेरिकी सैनिकांना प्रारंभिक बाधा झाली.
अमेरिकेतील इलिनोईस आणि लोवा स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी व्हिएतनाममध्ये फवारलेल्या एजन्ट ऑरेन्जच्या परिणामांची नोंद केली आहे. यात, ज्या ठिकाणी आजही अन्नधान्यांत डायऑक्सिनचे अंश सापडतात, अशा प्रमुख भागांचाही समावेश आहे.
याबाबत इलिनोईस विद्यापीठातील प्राध्यापक केन ऑलसन यांनी सांगितले की, ‘एजन्ट ऑरेंज आणि डायऑक्सिनबाबतचे हे संशोधन हे प्राथमिकदृष्टय़ा वैद्यकीय स्वरूपाचे आहे. यात आम्ही या रसायनांचा त्वचेशी संपर्क आल्याने मानवावर होणारा परिणाम आणि अमेरिकी सैनिकांवर झालेले दीर्घकालीन परिणाम यांवर लक्ष केंद्रित केले आहे.’ या तणनाशकाचा व्हिएतनामच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर झालेला अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम, तेथील माती, पाणी, गाळ, मासे आदी जलचर आणि अन्नपुरवठा, लोकांचे आरोग्य यांवर डायऑक्सिनचा सातत्याने कितपत परिणाम झाला, याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.