भारतीय आणि हॉटेलिंग यांचे नाते अत्यंत जवळचे आहे. पार्टी करायला किंवा हॉटेलिंग करण्यासाठी अगदी छोटेसे कारणही पुरेसे ठरते. हॉटेलमधील मेन्यू कार्डवर नजर टाकताच काय खायचे हे ठरवले जाते. कधी कधी मात्र तेच तेच पदार्थ सारखे मागवायचे का? असा प्रश्न पडतो. मात्र पार्टी करायची तर आपली आवडती डिश मागवायचीच असाही एक ट्रेंड दिसून येतो. २०१७ या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे ती ‘चिकन बिर्याणी’ला. वर्षभरात भारतीयांनी हॉटेलिंग करताना सर्वाधिक पसंत केली आहे ती चिकन बिर्याणी.

काही दिवसांपूर्वीच ‘स्विगी या फूड सर्व्हिस’ने एक सर्वे केला. त्या सर्वेत हे निरीक्षण समोर आले आहे. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. चिकन बिर्याणी पाठोपाठ ‘मसाला डोसा’, ‘बटर नान’, ‘तंदुरी रोटी’ आणि ‘पनीर बटर मसाला’ यांचाही नंबर लागतो. २०१७ या वर्षात हॉटेलमध्ये जाणाऱ्या भारतीयांनी हे पदार्थ सर्वात जास्तवेळा ऑर्डर केले आहेत.

रात्री उशिरा केलेल्या ऑर्डर्स, सकाळी नाश्त्यासाठी मागवण्यात आलेले पदार्थ, दुपारच्या जेवणाच्या वेळी मागवण्यात आलेले पदार्थ अशा पदार्थांचा या सर्वेमध्ये समावेश आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आला. ज्यानंतर समोर आलेल्या अहवालानुसार मसाला डोसा, इडली आणि वडा यांचे नाश्त्याच्या पदार्थांवर अधिराज्य आहे. दुपार आणि रात्रीच्या जेवणात बहुतांश लोकांनी चिकन बिर्याणी, पनीर बटर मसाला आणि मसाला डोसा यांना पसंती दिली आहे. दाल मखनी, चिकन फ्राईड राईस हे पदार्थही बऱ्याचवेळा मागवले जातात.

संध्याकाळचा विचार केला तर पावभाजी, फ्रेंच फ्राईज, समोसे, चिकन रोल, चिकन बर्गर आणि भेळ पुरी खाण्यावर भारतीयांचा भर दिसून येतो. तर डेझर्ट म्हणून ‘डेथ बाय चॉकलेट’ (चॉकलेट संडेतला एक प्रकार) आणि ‘न्युटेला ब्राऊनी’ या दोन्ही पदार्थांना अनेक भारतीयांनी पसंती दिली आहे. गुलाबजाम आणि रसमलाई हे पदार्थ मागवण्यावरही लोकांचा भर दिसून आला. महत्त्वाची बाब म्हणजे पिझ्झा हा पहिल्या पाच पदार्थांच्या यादीतही नाही.

मुंबईकरांनी पहिली पसंती दिली आहे ती पाव-भाजी खाण्याला तर दिल्लीतील लोकांनी दाल मखनी आणि नान खाण्यावर भर दिला. तर हैदराबादमध्ये राहणाऱ्या लोकांनी बिर्याणीशिवाय काहीही इतर मागवले नाही. मात्र देशातली हॉटेलमध्ये जाणाऱ्या लोकांचे प्रमाण पाहता चिकन बिर्याणी मागवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चिकन बिर्याणी ही भारतीयांची आवडती डिश ठरली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Story img Loader