लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे कठीणच. अनेक मुले सतत मोबाईलवर गेम्स खेळताना दिसून येतात. हे गेम्स अनेकदा मोठ्यांच्या भाषेत सांगायचे तर टाइमपास अॅप्स असतात. मात्र मुलांशी मोबाईलवरून वाद घालत बसण्याऐवजी त्यांना काहीतरी शिकवणारे गेम अॅप्स वापरून खेळ आणि शिकवणीचा योग्य मेळ साधता येईल. बालदिनाच्या निमित्ताने अशाच काही मस्त अॅप्सवर टाकलेली नजर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किड्स मॅथ्स फ्री (Kids Math FREE)

अंकगणित शिकणा-या तीन वर्षांवरील मुलांसाठी गेम्स आणि चित्रांच्या रुपात गणित शिकणे सोपे होईल. यामध्ये अंक मोजण्यापासून ते शब्दात कसे लिहायचे याचाही स्क्रीनवर अभ्यास करता येतो. तसेच बेरीज वजाबाकीमधील बारकावे लहान मुलांना समजतील अशा भाषेत समजवले जातात. ग्राफिक्स उत्तम असल्याने मुलांना या अॅपचा कंटाळा येणार नाही हे मात्र नक्की…

Kids Math FREE

आयस्टोरी बुक्स (iStoryBooks)

झोपताना मुलांना छानशी गोष्ट ऐकण्याची इच्छा असते. अशावेळेस तीच तीच गोष्ट सांगण्याऐवजी या अॅपवरून लहान मुलांसाठी लिहिण्यात आलेल्या जगभरातील गोष्टी उपलब्ध होतात. त्याशिवाय दिवसभरात मुलांना सतत खेळायला पाठवण्याऐवजी गोष्टीचं अॅप चांगला पर्याय ठरू शकतो. यामधील चित्र अगदी पुस्तकातल्या चित्रांप्रमाणे स्पष्ट आहेत. ही पुस्तके डाऊनलोड करून इंटरनेट न वापरताही वाचता येऊ शकतात. दर दोन आठवड्याला या अॅपवर नवीन पुस्तके अपलोड केली जातात.

iStoryBooks

स्ट्रिमी विंडो (Steamy Window)

लहान मुलांबरोबरच सर्वांना खिडकीच्या काचेवर पडलेल्या बाष्पावर चित्र काढायला आवडते. हेच या अॅपच्या माध्यमातून करता येते. संपूर्ण अॅपमध्ये न जाता फक्त अॅपच्या आयकॉनवर टच करून होमस्क्रीनवरही ही भन्नाट चित्रकला करू शकता. तसेच मोबाईल स्क्रीनवर फुंक मारल्यावर पुन्हा त्यावर बाष्प साठते. यात आईस इफेक्ट, कस्ट्म बॅकग्राऊण्डसारखे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Steamy Window

किड्स प्रीस्कूल पझल्स लाइट (Kids Preschool Puzzles Lite)

मुलांना प्राणी, पक्षी तयार करण्यासाठी नेहमीच दुकानातून पझल्स घेण्याऐवजी या अॅपवर मुलांच्या मेंदूला चालना देणारी कोडी उपलब्ध आहेत. गाड्या, खेळ, आकार, आकडे, अक्षर यासंदर्भातील अनेक कोडी या अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. या अॅपमध्ये जास्त ऑडिओ आणि व्हिज्युअल इफेक्ट्स वापरण्यात आल्याने डोळ्यांना त्रासही कमी होतो. या गेम्समधून मुलांची विचार क्षमता वाढण्याबरोबर त्यांची निर्णयक्षमताही वाढते.

Kids Preschool Puzzles Lite

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens day games on mobile which are useful for the mental growth of the child