नवख्या प्रेमवीरांना अनेकदा आवडत्या व्यक्तीला भेटायचे कसे, त्याच्याशी बोलायचे कसे किंवा त्या व्यक्तीसमोर आपल्या प्रेमाची कबुली कशी द्यायची असे असंख्य प्रश्न पडतात. मग त्यावेळी एखाद्या अनुभवी आणि प्रेमाचे अनेक पावसाळे पाहिलेल्या मित्र किंवा मैत्रिणीची मदत घेतली जाते. मात्र, इतका सगळी तपश्चर्या करून समोरची व्यक्ती होकाराचे दान पारड्यात टाकेल, याची काही खात्री नसतेच. पण समजा, डेटिंग किंवा प्रेयसीला मागणी कशी घालायची याचा एखादा अभ्यासक्रमच विद्यापीठात शिकवला गेला तर काय होईल? हा प्रकार तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल पण चीनमधील विद्यापीठात खरोखरच अशाप्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. एरवी अनेक गोष्टींवर बंधने असणाऱ्या या देशात असे काही घडेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, येथील तानजीन विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या ‘क्वेकिआओई’ या समुहाकडून डेटिंगचे प्रशिक्षण देणारा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात एकूण ३२ प्रशिक्षण सत्रांचा समावेश असून यामध्ये मैत्री आणि डेटिंग करण्याच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकदेखील करून घेण्यात येणार असल्याचे चायना डेली या वृत्तपत्राकडून सांगण्यात आले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला लगेचच वास्तव परिस्थितीत आपले कौशल्य सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. स्वत:च्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड मिळवलीत आणि त्यानंतर तुमच्यातील नाते कसे आहे, हे पाहिल्यानंतरच तुम्हाला अभ्यासक्रमात किती गुण द्यायचे, हे ठरविण्यात येणार असल्याचे या अभ्यासक्रमाचे संचालक काँग यिंग यांनी सांगितले.

Story img Loader