चॉकलेट हा अनेकदा लहान मुलांबरोबरच मोठ्यांचासुद्धा वीक पॉईंट असतो. चॉकलेटचे नुसते नाव काढले तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. शुभेच्छा देताना, सणवारांचा आनंद साजरा करताना तर कधी आजारी व्यक्ती बरी होताना आणि आपले एखाद्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट दिले जाते. सध्या बाजारात चॉकलेटसचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यात वेगवेगळे फ्लेवर्सही मिळतात. चॉकलेट खाल्ल्याने एकप्रकारे तरतरी येते असेही म्हणतात. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खाल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. मेंदू, हृदयविकार आणि स्ट्रोकसारखे आजार होण्याची शक्यता चॉकलेट खाण्याने कमी होते. चॉकलेटमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे शरीराला याचा फायदा होतो.
हे झाले चॉकलेट खाल्ल्याचे फायदे. पण आता हे चॉकलेट केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असल्याचे समोर आले आहे. चॉकलेट सूर्य किरणांपासून त्वचेचा बचाव करतं असं काही संशोधकांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. बराच काळ सूर्यप्रकाशात फिरल्यामुळे त्वचा काळी पडते. इतकेच नाही तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे काहीवेळा त्वचेचे विविध आजार अगदी त्वचेचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते. अशावेळी चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंट सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचं संरक्षण करू शकतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
यासाठी जर्मनीच्या डुशेल्डॉल्फ विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री आणि मॉल्यिक्यूलर बायोलॉजीच्या प्राध्यापकांनी चॉकलेटमधील अॅँटिऑक्सिडंट, अल्ट्रा-व्हायलेट किरणांपासून त्वचेचं संरक्षण करू शकतात का यावर संशोधन केलं. ज्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असलेलं चॉकलेट खाल्लं त्या व्यक्तीच्या त्वचेवर अल्ट्रा व्हायलेट किरणांचा फारसा प्रभाव जाणवून आला नाही. अशाच प्रकारचं एक संशोधन कॅनडातील शास्त्रज्ञांनी देखील केलं होतं. डॉ. सिव्ही डोडिन यांच्या संशोधनात मात्र, जास्त अँटिऑक्सिडंट असलेलं चॉकलेट खाल्याचा चांगला परिणाम लोकांच्या त्वचेवर आढळून आला नाही.
आता हे झाले चॉकलेट खाण्याचे फायदे. पण चेहऱ्याला चॉकलेट लावल्यास त्याचाही आपल्याला फायदा होत असल्याचे समोर आले आहे. चॉकलेटचा फेस पॅक त्वचा चांगली करण्यासाठी उपयुक्त असतो. विरघळलेलं चॉकलेट, मध, दही आणि साखरेच्या मिश्रणाचा चॉकलेट फेस पॅक म्हणून उपयोग केला जातो. हे मिश्रण २० मिनिटे लावून नंतर चेहरा धुतल्यास त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. अनेकदा कोरड्या त्वचेवर स्किन क्रीमसुद्धा फायदेशीर ठरत नाहीत. अशा वेळी चॉकलेट त्वचेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं. कोरड्या त्वचेवर उपाय करण्यासाठी दोन चमचे विरघळलेल्या चॉकलेटमध्ये दोन चमचे नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल टाका. हे मिश्रण त्वचेवर लावा. कोरडी त्वचा मऊ करण्यासाठी हे मिश्रण उपयोगी ठरू शकतं. विरघळलेलं चॉकलेट कोमट करुन त्याने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.