महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील हृदयविकार विभागातील डॉक्टर गेली तीन वर्षे हृदयविकाराच्या वेगवेगळ्या कारणांवर संशोधन करीत आहेत. त्यापैकी सिगारेट व तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासात चाळीशीपूर्वीच सिगारेट ओढणाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे आढळून आले. यातील गंभीर बाब म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्यांमधील ५३ टक्के रुग्ण ३५ वर्षांच्या आतील असून यापैकी सर्वात तरुण रुग्णाचे वय अवघे सतरा वर्षे असल्याचे आढळून आले आहे.
सिगारेट व तंबाखू सेवनामुळे हृदयविकाराचा त्रास होतो हे यापूर्वीही अनेक जागतिक संशोधनात स्पष्ट झाले असून याबाबतची आकडेवारीही वेळोवेळी जाहीर करण्यात येते. भारतात त्यातही मुंबईसारख्या महानगरातील सायन रुग्णालयाच्या हृदयविकार विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. अभिषेक वाडकर याने केलेल्या संशोधनानंतर ही बाब पुढे आली आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या चाळीशीच्या आतील ४०० रुग्णांचा डॉ. अभिषेक यांनी गेल्या तीन वर्षांत अभ्यास केला. यात या रुग्णांचा आर्थिक स्तर, धुम्रपानाचे प्रमाण, खाण्यापिण्याच्या सवयी याची बारकाईने नोंद करून यातील धुम्रपान सोडलेल्या व न सोडलेल्यांना औषधोपचारानंतरही किती कालावधीत पुन्हा त्रास याचा अभ्यास करून उपचाराची दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.
या ४०० रुग्णांमध्ये २८ महिलांचा समावेश असून १५ ते ३० वर्षे वयोगटातील ७४, ३१ ते ३५ वर्षे वयोगटातील १३८ तर ३६ ते ४० वर्षे वयोगटातील १८८ रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी २६० रुग्णांना अँजिओप्लास्टी अथवा बायपासची गरज लागली तर ३५ टक्के रुग्ण हे औषधोपचाराने बरे झाले. उपचारानंतरही १७८ जणांना पुन्हा छातीत दुखू लागले असून यातील बहुतेकांना धुम्रपानाची सवय सोडता आलेली नाही, असेही आढळून आले. या अभ्यासासाठी विभागप्रमुख डॉ. प्रताप नाथानी, प्राध्यापक डॉ. अजय महाजन तसेच डॉ. हेतन शहा, डॉ. अनुज साठे, डॉ. महेश धागरे, डॉ. दिपक बोहरा आदींची मदत झाली. धुम्रपानाची सवय तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब आहे, अशा रुग्णांचा अभ्यास डॉ. वाडकर यांनी केला असून याबाबतचा शोधनिबंध सादर केला जाणार आहे.  

Story img Loader