नव्या वर्षांत सिगारेटचे व्यसन सोडण्याचा संकल्प तुम्ही योजिला असेल, तर तुमचे मद्यपानाचे प्रमाण कमी करण्याचीही तुमच्या मनाची तयारी झालेली असते, असा दावा एका अभ्यासानंतर संशोधकांनी केला आहे. अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. मद्यपानाचे प्रमाण कमी केले की, त्याची मदत धूम्रपानाची सवय सोडण्यासाठीही होते, असे त्यांना आढळून आले आहे.
अति मद्यपान करणाऱ्या व्यक्तीने मद्य घेण्याचे प्रमाण कमी केले, की त्याच्यातील निकोटिन-मेटाबोलाइटचे गुणोत्तर घटते. निकोटिन-मेटाबोलाइटचे गुणोत्तर हे, एखाद्या व्यक्तीचे शरीर किती वेगाने निकोटिनचे चयापचय घडवून आणते, याचे निदर्शक आहे. हे निष्कर्ष ‘निकोटिन अॅन्ड टोबॅको रिसर्च जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
याआधी झालेल्या संशोधनांनुसार, निकोटिन-मेटाबोलिझम गुणोत्तर जास्त असलेल्या व्यक्ती अधिक धूम्रपान करणाऱ्या असतात. हे गुणोत्तर जास्त असलेल्या लोकांना विडी-सिगारेटचे व्यसन सोडणे कठीण जाते.
याबाबत ओरेगॉन स्टेट विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक साराह डरमोडी यांनी सांगितले की, सिगारेट सोडणे कठीण बनलेल्या व्यक्तीचे मद्यपानाचे प्रमाण कमी करून त्याचे निकोटिन-मेटाबोलिझमचे प्रमाण कमी केल्यास ते त्याला (धूम्रपान सोडण्यास) साह्य़कारी ठरू शकते. धूम्रपान सोडण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीची आवश्यकता असते. त्यासाठी अनेकदा प्रयत्नही करावे लागतात, असे त्या म्हणाल्या.
मद्यपानामुळे निकोटिनच्या चयापचयात बदल होतो. निकोटिन-मेटाबोलाइट गुणोत्तरातून हे दिसून येते. त्यामुळे रोजचे सिगारेटचे व्यसन आणि मद्यपान या दोन्हीपासून सुटका करून घेण्याचे प्रयत्न एकाच वेळी केले पाहिजेत, असे डरमोडी यांनी स्पष्ट केले.