How To Clean Pigeon Poop On Windows: अनेकजण घरात किंवा बाल्कनीत सतत येणाऱ्या कबुतरांमुळे त्रस्त असतात. कबूतर सतत बाल्कनीमध्ये येऊन घाण करतात, कबुतरांनी केलेल्या या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे श्वसनाशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. याशिवाय कबुतरांच्या विष्ठेने तुम्ही हौशीने सजवलेली बाल्कनी, गॅलरी सुद्धा गलिच्छ दिसू लागते. यात आणखी त्रास म्हणजे हे डाग सुकून अजून गडद होतात. ज्यामुळे पाणी ओतून, झाडू मारून स्वच्छता केली तरी काहीच फरक दिसत नाही. आज आपण याच समस्येवर काही सोपे उपाय पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅन्सी खिडक्या, गॅलरी, बाल्कनी लक्ख व स्वच्छ ठेवण्यास मदत होऊ शकते. चला तर…
कबुतरांच्या विष्ठेचे डाग कसे घालवावेत? (How To Clean Pigeon Poop On Windows)
१) सर्वात आधी आपण जमिनीवरून तसेच बाल्कनीच्या ग्रीलवरून डाग कसे काढायचे हे पाहूया. वर म्हंटल्याप्रमाणे फक्त पाण्याने हे डाग जाणार नाहीत, त्यासाठी आपण थोडे कोमट पाणी घ्यावे, यात कपडे धुण्याचे डिटर्जंट व अगदी किंचित व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करून घ्या. हे पाणी जमिनीवर ओतून १० ते १५ मिनिट असेच राहू द्या. मग आधी हिराच्या झाडूने घासून घ्या, मग तुम्ही बाथरूममध्ये वापरला जाणारा ब्रश वापरून लादी घासू शकता. दुर्गंधी घालवण्यासाठी आपण थोडे तुमच्या आवडीचे फिनेल, वॉशिंग लिक्विड किंवा अगदी डेटॉल सुद्धा घालू शकता.
२) आता राहिला प्रश्न तुमच्या खिडक्यांच्या काचेवर डाग पडले असतील तर, तुम्ही शक्य असल्यास थेट पाणी ओतू शकता अन्यथा स्प्रे बॉटलमध्ये पाणी काढून घ्या व ते डागांवर टाका. १५ मिनिटांनी कागदाचा चुरगळा करून मग हे डाग स्वच्छ करा.
हे ही वाचा<< पाण्याचा माठ नक्की किती दिवसांनी धुवावा? न धुतल्यास काय होते याचा ‘हा’ Video पाहून व्हाल थक्क
दरम्यान, कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी चिकट पदार्थही मदत करतात. यासाठी मधासारखे चिकट पदार्थ बाल्कनीत ठेऊ शकता. बाल्कनीत चमकदार गोष्टी ठेवा, चमकदार गोष्टी असतील तिथे कबूतर जाणे टाळतात. त्यामुळे कबुतरांना रोखण्यासाठी हे फायदेशीर ठरेल.