सेल्फी काढला नाही असा एकही दिवस अनेकांचा जात नाही. हे सेल्फीचं वेड जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून सतत सेल्फीबद्दल काहीना काही वाचायला मिळत आहे. आता वारंवार सेल्फी घेणं हा मानसिक आजार असून त्यावर लवकरच उपाय करणं गरजेचं असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. सेल्फी घेणं हा मानसिक आजार असल्याचं २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटलं होतं. पण, नंतर मात्र हे निदान पूर्णपणे चुकीचं असल्याच्या चर्चा ऐकीवात होत्या. पण तीन वर्षानंतर हा अहवाल खोटा नसून वारंवार सेल्फी घेणं आणि सोशल मीडियावर अपलोड करणं हा खरच एक मानसिक आजार असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. या मानसिक आजाराला ‘सेल्फीटीस’ selfitis असं नाव देण्यात आलं आहे.
जनादर्नन बालकृष्णन आणि मार्क ग्रिफीथ या दोन संशोधकांनी ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ अॅडिक्शन’मध्ये त्यांचं संशोधन प्रकाशित केलं. सेल्फीटीस’ selfitis या मानसिक आजारांच्या तीन पायऱ्या आहेत. बॉर्डरलाइन, अक्युट आणि क्रोनिक अशा स्वरूपाच्या या तीन पायऱ्या आहेत. बॉर्डरलाइन या पहिल्या पायरीत लोक दिवसातून किमान तीन सेल्फी घेतात पण ते सोशल मीडियावर अपलोड करत नाही. दुसऱ्या पायरीत लोक सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करतात. आणि तिसऱ्या पायरीत असे लोक दिवसातून किमान सहा वेळा सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करतात.
जवळपास ४०० विद्यार्थ्यांच्या माहितीवर हे संशोधन करण्यात आलं होतं. हे विद्यार्थी भारतीय महाविद्यालयातले होते. भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे गेल्यावर्षभरात सेल्फीमुळे जगात जेवढे मृत्यू झाले आहेत त्यातले सर्वाधिक मृत्यू हे भारतात झाले आहेत म्हणूनच १६ ते २५ वयोगटातील भारतीय तरुण या संशोधनाच्या केंद्रस्थानी होते.