केंद्र सरकारची माहिती
सध्या जगाला सर्वाधिक धोका आहे हवामान बदलाचा. हवामान बदलामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून त्यामुळे विविध विकारांचाही प्रादुर्भाव वाढत आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्यासही हवामानातील बदल कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे. केंद्राच्या पर्यावरण व वन खात्याकडून ‘हवामानातील बदल आणि भारत’ या शीर्षकाखालील अहवाल प्रकाशित केला आहे. क्षेत्र आणि प्रांतवार वर्गवारीनुसार केलेल्या सर्वेक्षणातील संकलित माहितीच्या आधारावर २०३०मध्ये असणाऱ्या परिस्थितीची मीमांसा या अहवालात करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच या अहवालाची माहिती संसदेत दिली.
मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्यास हवामानातील बदलच कारणीभूत असल्याचे हा अहवाल सांगतो. हिमालयात जल उत्पत्तीसाठीचे विविध प्रकल्प त्याचबरोबर अन्य तीन प्रांतांतदेखील प्रकल्पांची वाढणारी संख्या मलेरियाच्या उत्पत्तीला आणि प्रभावाला पोषक वातावरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा सर्वेक्षणात केला गेला आहे.
केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी तुर्कीत पार पडलेल्या ‘जी २०’ परिषदेतही भारताने आपली भूमिका मांडताना ऊर्जेच्या अफाट आणि वेगाने वाढणाऱ्या मागणीची पूर्तता शाश्वत मार्गानेच करण्यावर भर देल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी २०२२पर्यंत भारताकडून अतिरिक्त १७५ जीडब्ल्यू फेरवापर ऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट आखले असून कार्बनच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असलेल्या फॉसिल तेल आणि कोळसा यांच्यासाठीच्या निधीतही कपात केली जाणार आहे, असे सांगितले.
हवामान बदलाचा परिणाम अर्थव्यवस्थेबरोबरच कृषी आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यावरही होत असल्याचे हा अहवाल सांगतो. हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांत पिकांच्या काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असेही जावडेकर म्हणाले.

Story img Loader