Clothes Allergies In Summer Season: उन्हाळ्यामध्ये त्वचेशी संबंधित समस्यांचे प्रमाण वाढत जाते. सतत येणारा घाम, कडक ऊन, धूळ-माती तसेच प्रदूषण अशा काही गोष्टींमुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होत असतो. यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढत जाते. उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रणामध्ये राहावे यासाठी नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. परिणामी घामोळे यायला लागतात. गरम वातावरण, घाम आणि घामोळे यांमुळे या काळात कपडे घालायची इच्छाच होत नाही. उन्हाळ्यात बऱ्याचजणांना कपड्यांमुळे त्वचेवर रॅशेज येऊ लागतात. उन्हाळ्यामध्ये जाड, गडद रंगाचे कपडे घातल्याने जास्त प्रमाणात गरम होते. गडद रंगामुळे सूर्याची किरणे अधिक प्रमाणात शोषली जातात. याने त्वचेला इजा होते. जाड कपडे परिधान केल्याने खाज, जळजळ असा अॅलर्जीचा त्रास सुरु होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.
ओट्सने अंघोळ करा.
उष्णतेमुळे त्वचेला अॅलर्जी झाल्यावर रॅशेज येतात. तेव्हा ओट्सचा पर्याय फायदेशीर ठरु शकते. यासाठी ओट्स पाण्यामध्ये टाकावेत व ज्या ठिकाणी रॅशेज दिसत आहेत, त्याजागी ते पाणी ओतावे. असे केल्याने खाज व जळजळ नाहीशी होण्यास मदत मिळते.
बर्फाचा वापर करा.
कपड्यामुळे त्वचेला अॅलर्जी झाल्यास एक सोपा उपाय करता येतो. यासाठी एका सुती कपड्यामध्ये बर्फ ठेवावा आणि तो बर्फ रॅशेज असलेल्या जागांवर फिरवावा. यामुळे जळजळ कमी होते.
कोरफडीचा अर्क लावा.
कोरफडी त्वचेसाठी खूप आरोग्यदायी असते. त्वचेला जळजळ किंवा खाज असा त्रास होत असेल, तर त्या जागेवर कोरफडीचा अर्क लावणे योग्य मानले जाते. घरात कोरफड असल्यास तिचा ताजा-ताजा अर्क शरीरावर लावल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
नारळाचे तेल
नारळाच्या तेलामुळे त्वचेवरील जळजळ नाहीशी होते. अंघोळ घेतल्यानंतर त्वचेवर नारळाचे खोबरेल तेल लावल्याने अॅलर्जीचा त्रास कमी होतो.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)