How to kill cockroaches: आपल्यापैकी अनेकांच्या घरात साफसफाई करूनही सतत झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. कालांतराने झुरळांची त्यांची पिल्लांद्वारे पैदास वाढू लागते. मग झुरळे घरातील फर्निचर, कपाट, बेड, दरवाजे, खिडक्यांवर बिनदक्कतपणे फिरताना दिसतात. अशा वेळी नक्की कोणता उपाय केल्यास झुरळे निघून जाण्यास मदत होईल ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या उपायांद्वारे मिळवा झुरळांपासून सुटका
- लाल मिरचीचे पाणी
पाण्यात लाल तिखट मिसळून, ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळे झाली आहेत, तिथे त्या पाण्याची फवारणी करा. अशा प्रकारे झुरळांचा नायनाट करण्यासाठी हे तिखट पाणी तुम्हाला फायदेशीर ठरेल.
- कापराची पावडर
घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी कापूर बारीक करून, त्याची पावडर बनवा आणि ज्या ठिकाणी झुरळे फिरतात, त्या ठिकाणी ठेवा. मग बघा झुरळे कशी पलायन करतात ते. कापरामध्ये कीटकांच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्यामुळे झुरळे त्या ठिकाणी थांबू शकत नाहीत.
- लिंबाचा रस
लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते. लिंबाचा ताजा सुगंध झुरळांना आकर्षित करून मारण्यास फायदेशीर ठरेल.
- लसूण आणि व्हिनेगर
लसूण बारीक करून, त्यात व्हिनेगर घाला आणि हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारा. त्यामुळे झुरळे मरतात. अशा रीतीने हळूहळू झुरळे कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा: गवारीची भाजी खायला आवडत नाही? ‘हे’ सात जबरदस्त फायदे वाचल्यावर ही भाजी आवडीने खाल
- बोरिक अॅसिड पावडर
झुरळांना मारण्यासाठी बोरिक अॅसिड पावडर खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बाजारातून बोरिक अॅसिड पावडर आणून, ती पावडर मैद्यामध्ये घालून त्याच्या गोळ्या बनवा. झुरळांचा संचार असलेल्या ठिकाणी या गोळ्या ठेवून द्या.