काही प्रथिनांचे मिश्रण तयार करून त्याच्या आधारे मलेरियावर अधिक सुरक्षित व प्रभावी लस तयार करता येईल, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील वॉल्टर रीड लष्करी संशोधन संस्थेतील वैज्ञानिक शितीज  दत्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी अ‍ॅपिकल मेमब्रेन अँटीजेन-१ (एएमए १) या प्रथिनावर संशोधन केले असून त्यांच्या मते हे प्रथिन प्लासमोडियम फालसिपारम हे परजीवी रक्तपेशींवर हल्ला करताना वापरत असतात व त्यामुळे नंतर मलेरिया होतो. एएमए-१ या प्रथिनांच्या अनेक रूपांच्या मिश्रणाने मलेरियावर परिणामकारक लस तयार करता येईल.
यापूर्वीही एएमए१ या प्रथिनावर आधारित लशींची निर्मिती करण्यात आली आहे परंतु त्याला अनेक मर्यादा आहेत. त्या यातून दूर करता येतील. मलेरियाला कारणीभूत ठरणारा परोपजीवी प्लासमोडियम फालसिपारमला मारण्यासाठी सध्याच्या लशी प्रभावी नाहीत. जर एएमए१ या प्रथिनाचे वेगवेगळे प्रकार वापरून लस तयार केली तर लस अधिक प्रभावी बनू शकेल. एएमए-१ या प्रथिनाचा वापर केलेल्या लशीमुळे मानवी प्रतिकारशक्ती वाढते. पण यापूर्वीच्या प्रयोगात ही लस पी. फालसिपारम या परोपजीवी जंतूच्या एकाच प्रजातीविरूद्ध परिणामकारक असल्याचे दिसून आले होते.
वैज्ञानिकांनी आता एएमए १ प्रथिनांचे मिश्रण तयार करून जी लस तयार केली त्याच्या आधारे प्लासमोडियमच्या अनेक प्रजातींना रोखणारे प्रतिपिंड सोडण्यात यश आले.
चार विविध जंतूंपासून काढलेल्या एएमए-१ या प्रथिनांचे मिश्रण असलेल्या लशीचा फायदा जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. क्वाडव्ॉक्स या प्रथिनांच्या मिश्रणापासून बनवलेल्या लशीमुळे मलेरियांच्या २६ प्रजातींच्या  परोपजीवी जंतूंना रोखता येते, असे विविध प्रयोगशाळातील संशोधनात दिसून आले आहे.
या लशीमुळे प्रथिनांच्या या विशिष्ट भागातून परोपजीवी जंतूला रोखणारे प्रतिपिंड सोडण्याची क्षमता म्हणजे इम्युनोजेनेसिटी वाढते असेही दिसून आले आहे. ‘प्लॉश पॅथोजेन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील वॉल्टर रीड लष्करी संशोधन संस्थेतील वैज्ञानिक शितीज दत्ता व त्यांच्या सहकाऱ्यांकडून संशोधन.

Story img Loader