झोपण्याच्या सहा तास अगोदर कॅफीनचे सेवन करण्याने झोपेवर वाईट परिणाम होतो असे संशोधनात दिसून आले आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर कॅफीनचे सेवन करणे थांबवले पाहिजे, त्यामुळे झोपेवर वाईट परिणाम होण्याचे टळते. संशोधकांच्या मते झोपण्यापूर्वी तीन ते सहा तास अगोदर ४०० मिलिग्राम म्हणजे २ ते ३ कप कॉफी सेवनाने झोप विस्कळित होते. जेव्हा आपण सहा तास अगोदर कॉफी सेवन करतो तेव्हाही झोपेचा कालावधी कमी झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसीनचे अध्यक्ष एम सफवान बद्र यांच्या मते, कॉफीमुळे झोप विस्कळीत होते असा झोपविषयक तज्ज्ञांचा पूर्वीपासूनचा संशय आहे. आताच्या अभ्यासात त्याचे वस्तुनिष्ठ पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. व्यवस्थित झोप येणाऱ्या बारा व्यक्तींवर प्रयोग केला असता त्यांना झोपण्यापूर्वी ४०० मिलिग्रॅम कॅफीनच्या गोळ्या देण्यात आल्या व काहींना काहीच द्रव्य नसलेल्या गोळ्या देण्यात आल्या. चार दिवसात असे दिसून आले की, ज्यांनी कॅफिन घेतले होते त्यांच्यात झोप विस्कळित दिसून आली. झोपण्यापूर्वी म्हणजे अगदी कामावरून घरी जातानाही कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा झोपेवर वाईट परिणाम होतो असे प्रमुख संशोधक ख्रिस्तोफर ड्रेक यांनी म्हटले आहे. दुपारी कॉफी घेतल्यास त्याचा फारसा परिणाम झोपेवर होत नाही असेही त्यांचे मत आहे. कॅफीनचा झोपेवर होणारा अनिष्ट परिणाम वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे दाखवणारे हे पहिलेच संशोधन आहे. ‘क्लिनिकल स्लीप मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
कॉफीमुळे झोपेवर विपरीत परिणाम
झोपण्याच्या सहा तास अगोदर कॅफीनचे सेवन करण्याने झोपेवर वाईट परिणाम होतो असे संशोधनात दिसून आले आहे.
First published on: 06-12-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coffee effected badly on sleep