Benefits Of Drinking Black Tea: आजही अनेक गावोगावी कोरा चहा प्यायला जातो. जुनी जाणती माणसं असं सांगतात की, “दुधाचा चहा प्यायल्याने किंवा दूध टाकून चहा खूप वेळ उकळल्याने ऍसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते.” म्हणूनच कोरा चहा पिणं हा त्यातल्या त्यात सोपा व फायदेशीर पर्याय मानला जातो. अलीकडे या कोऱ्या चहाचं लेमन टी व्हर्जन प्रसिद्ध आहे पण मुळात कोरा चहा हा फार पूर्वीपासून गावाखेड्यात लोकांच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग होता. आता एका नवीन संशोधनात याच कोऱ्या चहाचे काही असे फायदे समोर येत आहेत की तुम्हीही आजपासूनच कोरा चहा प्यायची सुरुवात कराल.
नवीन संशोधनानुसार, दररोज कोरा चहा पिल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारून लोकांमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठ आणि चीनमधील साउथईस्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की दररोज कोरा चहा पिणाऱ्यांमध्ये प्री-डायबिटीजचा धोका ५३ टक्के कमी असतो तर टाइप २ मधुमेहाचा धोका ४७ टक्के कमी होतो. वय, लिंग, अनुवांशिकता, बॉडी मास इंडेक्स (BMI), सरासरी रक्तदाब, प्लाझ्मा ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल हे घटक सुद्धा डायबिटीजच्या वाढीवर प्रभाव टाकतात.
कोरा चहा पिण्याचे फायदे (Black Tea Benefits)
अॅडलेड विद्यापीठातील अभ्यासक टोंगझी वू सांगतात की, “कार्डिओव्हॅस्क्युलर व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यात कोरा चहा उपयुक्त ठरू शकतो, पण नेमकं यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, कोरा चहा प्यायल्याने लघवीमधून ग्लुकोजचे वाढलेले उत्सर्जन होत असावे आणि म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.”
कोऱ्या चहाचा आणखी एक फायदा म्हणजे चयापचयाचा वेग वाढवणे. कोऱ्या चहाच्या मायक्रोबायल फर्मेंटेशनमुळे अल्कलॉइड्स, फ्री एमिनो अॅसिड्स, पॉलिफेनॉल्स, पॉलिसेकेराइड्ससारखे कंपाउंड सक्रिय होतात जे पचनाचा वेग वाढवण्यास मदत करतात. याशिवाय कोऱ्या चहामधील दाहकविरोधी गुणधर्मामुळे स्वादुपिंडातील व आतड्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते.
संशोधन काय सांगते?
दरम्यान, क्रॉस-सेक्शनल अभ्यासामध्ये चीनच्या ८ प्रांतांमधील काही प्रतिनिधींवर संशोधन झाले होते. यामध्ये १९२३ प्रौढ (५६२ पुरुष, २०-८० वर्षे वयोगटातील १३६१ महिला) समाविष्ट आहेत. यातील ४३६ सहभागींना मधुमेह होता आणि ३५२ जणांना प्री-डायबेटिस होता तर १,१३५ लोकांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य होती.
सहभागींचे चहा पिण्याचे प्रकार (म्हणजे कधीच नाही, अधूनमधून, अनेकदा आणि दररोज) असे होते व त्यात विशेष ग्रीन टी, काळा चहा याचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. संशोधकांनी चहाच्या सेवनाची वारंवारता आणि लघवीतील ग्लुकोजचे उत्सर्जन, इन्सुलिन प्रतिरोधकता या दोन्हीमधील संबंध तपासले होते. यात असे आढळून आले की, डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींच्या किडनीमध्ये ग्लुकोजचे शोषण अधिक होत असल्याने लघवीवाटे ग्लुकोज बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यातून ब्लड शुगर वाढते.
हे ही वाचा<< Sexual Health Yoga: लैंगिक व प्रजनन क्षमतेसाठी कोणते योगासन फायद्याचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या प्रभाव व कृती
या संशोधनातून असे दिसून आले होते की, कोऱ्या चहातील कंपाउंडमुळे किडनीमधील ग्लुकोज हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शरीराबाहेर टाकण्याची वारंवारता नियंत्रणात आणली जाते. या संशोधनातील सहअभ्यासक झिलीन सन सांगतात की, “दररोज कोरा चहा प्यायल्याने टाईप २ डायबिटीजचा धोका कमी होऊ शकतो आणि काही प्रमाणात रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण सुद्धा मिळवता येते. त्यामुळे दुधाच्या चहाऐवजी कोरा चहा पिण्याचा आरोग्यदायी बदल आपणही करून पाहू शकता.”