हिवाळा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच बरोबर युरोपमध्ये करोनाची नवीन लाट येण्याची चिंता वाढत आहे. ओमिक्रॉन सबवेरियंट्स BA.4 आणि BA.5 यांनी उन्हाळ्यात सर्वत्र दहशत माजवली होती. अजूनही त्यांचे संक्रमण सुरू आहे. पण चिंतेची बाब म्हणजे आता ओमिक्रॉनचे नवीन सबवेरिएंट्स दिसू लागले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ ओमिक्रॉनच्या शेकडो नवीन प्रकारांचा मागोवा घेत आहेत.
सीएनएनच्या बातम्यांनुसार, बुधवारी उशिरा जाहीर झालेल्या डब्ल्यूएचओच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की चाचणीत मोठी कमी असूनही, युरोपमधील प्रकरणे गेल्या आठवड्यात १.५ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहेत. युरोपमध्ये ही संख्या वाढत असली तरीही जागतिक स्तरावर प्रकरणांची संख्या कमी होत आहे. अलीकडेच, ब्रिटेन मधील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.
( हे ही वाचा: पाठीच्या ‘या’ भागात दुखणे ठरू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण; जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)
ब्रिटेनमध्ये अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल
यूकेमधील गिम्बे या स्वतंत्र वैज्ञानिक प्रतिष्ठानच्या आकडेवारीनुसार ४ ऑक्टोबर रोजी इटलीमध्ये कोविड-१९ च्या लक्षणांसोबत रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आहे. तर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर त्याच आठवड्यात यूकेमध्ये कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढली आहे.
आरोग्य यंत्रणेवर दबाव येण्याची शक्यता
ओमिक्रॉनवरील प्रभावी लस सप्टेंबरमध्ये युरोपमध्ये लाँच करण्यात आली. ही लस BA.1 आणि BA.4/5 वर फायदेशीर होती. यूकेमध्ये, फक्त BA.1 प्रभावी लसींना मान्यता देण्यात आली होती. युरोपियन आणि ब्रिटीश अधिकारी केवळ वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांसाठी नवीन बूस्टर डोस देत आहेत. दरम्यान, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात चेतावणी दिली की फ्लूचा वाढत प्रसार आणि COVID-19 चे पुनरागमन यामुळे राष्ट्रीय आरोग्य सेवेवर दबाव येण्याची शक्यता आहे.