लॉकडाउन दरम्यान दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्कवर अधिक ताण येऊ नये यासाठी YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओंची क्वालिटी डिफॉल्ट ‘स्टँडर्ड डेफिनेशन’वर (SD) सेट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याची घोषणा केली आहे.

‘आमच्या प्लॅटफॉर्मवर HD आणि अल्ट्रा-एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंगला  SD पर्यायात डिफॉल्ट सेट केले जाईल, याचा बिटरेट मोबाइल नेटवर्कवर 480p पेक्षा जास्त नसेल. त्यामुळे पुढील काही दिवस ग्राहकांना कमी क्वालिटीचे व्हिडिओ पाहावे लागतील’, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आलीय. हा निर्णय जगभरात लागू असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय कंपनीने आपल्या होमपेजवर करोना व्हायरसबाबत सर्व आवश्यक माहिती देणारे एक प्रोमो कार्ड बनवले आहे. यापूर्वी, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांसारख्या अन्य स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही अशाच प्रकारची पावलं उचलली आहेत.

करोना व्हायरसमुळे जगातील बहुतांश देशांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत. अनेक शहरे लॉकडाउन झाली असल्याने इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय.  युजर्स घरबसल्या व्हिडिओ पाहण्यास पसंती देत असल्याने व्हिडिओंची मागणी प्रचंड वाढली आहे, परिणामी दूरसंचार सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या नेटवर्कवर ताण येतोय.  त्यामुळे इटंरनेट स्पीड कमी झाल्याची तक्रार अनेकांकडून केली जात आहे. म्हणून बँडविड्थ कमी होऊ नये यासाठी स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या कंपन्या स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याचा निर्णय घेत आहेत.  अधिक बिटरेटच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगमुळे नेटवर्कवर दबाव वाढतो आणि मागणी अधिक असल्यास ‘नेटवर्क जाम’ होण्याचाही धोका असतो.

Story img Loader