देशामधील करोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून नागरिकांना घरात राहण्याचेही आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत. भारतातील ५४८ जिल्हे लॉकडाउन करण्यात आले असून ३० राज्ये सध्या लॉकडाउन आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतानाच दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीन्सला एक महत्वाची सूचना केली आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन व्हॉट्सअॅप अॅडमीन्स काय खबरदारी घ्यावी यासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं आहे. “सर्व ग्रुप अॅडमीनने नोंद घ्या, की व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरून अफवा पसरविल्या जात आहेत. तरी सर्व ग्रुप अॅडमीनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन Only Admin अशी सेटिंग करून घ्यावी,” असं पोलीसांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे. तसेच ही सेटींग करुन आपण सर्वजण मिळून अफवांचा प्रसार थांबवुयात असं आवाहनही पोलिसांनी या ट्विटमध्ये केलं आहे.
याआधीही राज्यामध्ये अनेकदा व्हॉट्सअॅप अॅडमीन्सला ग्रुपवरील पोस्टसाठी दोषी ठरवत कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच पोलिसांनी व्हॉट्सअॅप अॅडमीन्सला अधिक सतर्क राहण्यासाठी ही सूचना दिली असल्याचे समजते. राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांचा पोलिसांकडून समाचार घेतला जात आहेत. तर दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवरही पोलिसांकडून राज्यामधील स्थितीची माहिती पुरवली जात आहे. यामध्ये अगदी अफवा पसरवू नका इथपासून ते कोणत्या दुकानांवर काय कारवाई करण्यात आलीपर्यंतचे अनेक अपडेट्स पोलीस खात्याच्या मार्फत फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवले जातं आहेत.