वॉशिंग्टन : नव्या संशोधनानुसार रक्तगुठळीच्या साध्या चाचणीने आता करोनाचे निदान करता येऊ शकेल. करोनाच्या गंभीर रुग्णांच्या त्वचेच्या लहान रक्तवाहिन्यांमध्ये सामान्य दिसणाऱ्या रक्ताच्या गुठळय़ा ओळखण्यासाठी संशोधकांनी ‘मिनिमली इन्वेझिव्ह टेस्ट’ वापरली. या अंतर्गत शरीरातील पेशी किंवा त्वचेचे नमुने (बायोप्सी) प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेतले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार त्वचेच्या नमुन्यांद्वारे करोनाने खराब झालेल्या उती ओळखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, इतर गंभीर श्वसनरोगाचे आजार आणि रक्तवाहिन्यांच्या विकारातील फरक समजण्यासही मदत होते. ‘द अमेरिकन जर्नल ऑफ पॅथॉलॉजी’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार यापूर्वी निदानासाठी मज्जातंतू, मूत्रिपड किंवा फुप्फुसांतील नमुन्यांची ‘बायोप्सी’ची आवश्यकता होती. अमेरिकेतील वेल कॉर्नेल संस्थेतील संशोधक व अभ्यास प्रकल्पाचे प्रमुख जेफ्री लॉरेन्स यांनी सांगितले की, गंभीर करोनामुळे होणारा फुप्फुसातील संसर्ग हा इतर श्वसनरोगापेक्षा वेगळा असल्याचे आमच्या अभ्यासगटाच्या सर्वप्रथम निदर्शनास आले.

संशोधकांनी १५ गंभीर करोना रुग्णांच्या सामान्य दिसणाऱ्या त्वचेचे चार मिलिमीटरचे नमुने घेतले. तसेच खोकला-तापाची साधी लक्षणे असलेल्या सहा सौम्य करोना रुग्णांच्या त्वचेचे नमुने घेतले गेले. त्याचबरोबर ज्यांचा मृत्यू करोना महासाथीआधी मूत्रिपडविकार अथवा श्वासविकारांमुळे झाला अशा नऊ रुग्णांच्या त्वचेचे नमुने घेतले गेले व या सर्व नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यात असे निदर्शनास आले की, श्वास किंवा मूत्रिपडविकाराने ग्रस्त रुग्ण व सौम्य करोनाग्रस्तांच्या त्वचेच्या नमुन्यात रक्ताच्या छोटय़ा छोटय़ा गुठळय़ा आढळल्या नाहीत. मात्र, गंभीर १५ करोना रुग्णांच्या नमुन्यांपैकी १३ रुग्णांच्या नमुन्यांत रक्ताच्या छोटय़ा गुठळय़ा आढळल्या. त्यामुळे रक्तवाहिन्यांत होणारा हा सूक्ष्म बदल गंभीर करोनाचे विशेष लक्षण असल्याचे संशोधकांना जाणवले. परिणामी, त्वचेच्या नमुन्यांच्या चाचणीद्वारे करोना गुठळय़ांचे निदान करणे आता शक्य आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.