Nasal Vaccine for Covid-19: चीनमधील करोनाच्या उद्रेकादरम्यान भारत सरकार आता प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्व तयारी करताना दिसत आहे. आता भारतात पुन्हा एकदा सरकारचे लक्ष करोना लसीकरणावर आहे. आजपासून को-विन पोर्टलमध्ये नेजल लस (Nasal Vaccine) समाविष्ट केली जाईल. सर्वातआधी आपण नेजल लस म्हणजे काय आणि ती कशी वापरली जाते ते सविस्तर जाणून घेऊया…
सर्वातआधी हे जाणून घ्या की ही लस बूस्टर डोसप्रमाणे लागू केली जाईल. भारत बायोटेकच्या या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीचे नाव iNCOVACC आहे. ही लस भारत बायोटेक आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने एकत्रित तयार केली असून तीन टप्प्यातील चाचण्यांमध्ये ती प्रभावी ठरली आहे. याच कारणामुळे करोनाच्या धोक्यात आता या लसीचा को-विन पोर्टलमध्ये समावेश केला जाईल.
ही लस नेमकी कशी वापरली जाते?
जेव्हा कधी लसीची चर्चा होते तेव्हा आपल्या मनात असंच चित्र तयार होतं की, एक तर ती हातावर दिली जाईल किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर सुईने टोचली जाईल.परंतु नेसल लस हातावर न लावता नाकातून दिली जाईल. आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, नाकातूनच करोना शरीरात पोहोचतो. अशा परिस्थितीत ही लस नाकातून दिली तर ती खूप प्रभावी ठरेल.
नेसल लसीमुळे (Nasal Vaccine) करोनाचा धोका टळेल का?
भारत बायोटेकच्या या लसीचा तीन वेळा प्रयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिन्ही चाचण्यांमध्ये ही लस प्रभावी ठरली आहे. पहिल्या टप्प्यातील ट्रायलमध्ये १७५ जणांचा आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये २०० जणांचा समावेश करण्यात आला होता. यानंतर तिसऱ्या टप्प्यात दोन चाचण्या झाल्या. पहिल्यामध्ये ३,१०० लोकांवर आणि दुसऱ्यामध्ये ८७५ लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर करण्यात आला आहे. एकामध्ये ही लस दोन-डोस लस म्हणून दिली गेली आणि दुसरी बूस्टर डोस म्हणून देण्यात आली.
हेही वाचा – नाकावाटे देता येणाऱ्या लसीवर संशोधन सुरू – पंतप्रधान मोदी
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल का?
लसीच्या चाचणीनंतर, भारत बायोटेकने दावा केला होता की ही लस खूप प्रभावी आहे आणि अप्पर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये करोनाविरूद्ध तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करेल. करोनाशी लढण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती इतकी मजबूत असली पाहिजे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर करोनापासून बरे होऊ शकता.
ही लस नेमकी कशाप्रकारे काम करते?
करोनाचा विषाणू मुख्यतः नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करतो. ही लस तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या रक्तात आणि नाकात प्रथिने बनवण्यासाठी करते. ज्यामुळे तुम्ही विषाणूशी सहज लढू शकता. सुमारे दोन आठवड्यांनंतर त्याचा प्रभाव तुमच्या शरीरात सुरू होतो.