औषधांच्या निर्मितीत बदल होण्याचा दावा
गायीचे दूध हे अन्न म्हणून परिपूर्ण आहे तसेच ते पचायलाही हलके असते. विशेष म्हणजे वैज्ञानिकांनी अलीकडेच केलेल्या संशोधनानुसार गायीच्या दुधातील पेप्टाइडमुळे पोटाच्या कर्करोगावर उपाय करता येतो. हे पेप्टाइड्स पोटातील कर्करोगग्रस्त पेशींना मारतात असे दिसून आले आहे. तैवान येथील संशोधकांनी असे म्हटले आहे, की गायीच्या दुधापासून मिळवलेल्या पेप्टाइडच्या तुकडय़ांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. लॅक्टोफेरिसिन बी २५ असे या पेप्टाइडचे नाव असून त्यामुळे मानवातील पोटाच्या कर्करोगावर इलाज करणे शक्य आहे.
लॅक्टोफेरिसिन बी २५ हा आतडय़ाच्या कर्करोगावर उपयोगी घटक असून, या प्रकारच्या कर्करोगाने आशियायी देशात अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात असे नॅशनल इलान युनिव्हर्सिटीच्या प्राणिशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचे वैज्ञानिक वेइ जुंग शेन यांनी म्हटले आहे. संशोधकांनी लॅक्टोफेरिसिन बी २५ पासून काढलेले पेप्टाइडचे तीन तुकडे घेऊन त्याचे कर्करोगग्रस्त पेशींवर काय परिणाम होतात याचा अभ्यास केला. या पेप्टाइडमध्ये सूक्ष्मजिवाणूनाशक गुणधर्म असतो. एलएफसीन २५ या पेप्टाइडमुळे गॅस्ट्रिक अॅडेनोकार्सिनोमा या पोटातील कर्करोगग्रस्त पेशी नाश पावल्या. बेकलिन-१ ला लक्ष्य केले असता त्यामुळे एलएफसीन २५ या पेप्टाइडची सायटोटॉक्सिक कृती वाढण्यास मदत होते. बेकलिन-१ हे माणसातील एक प्रथिन असून ते ऑटोफॅगी, गाठींची वाढ व न्यूरॉनचा ऱ्हास अशा अनेक बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. लॅक्टोफेरिसिन बी २५ पेप्टाइडवरील या संशोधनातून पुढे पोटाच्या कर्करोगावरील औषधांच्या निर्मितीत अनेक बदल होऊ शकतात. आतडय़ाच्या कर्करोगावर अधिक प्रभावी औषधे तयार करता येतील असे शेन यांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘डेअरी सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
कर्करोगग्रस्त पेशींवर हल्लाबोल
सूक्ष्मदर्शकाखाली बघितले असता असे दिसून आले, की एलएफसीन २५ या पेप्टाइडचे तुकडे या कर्करोगग्रस्त पेशीत शिरले व त्यानंतर त्या पेशी नाश पावल्या किंबहुना त्यांच्या सर्व क्षमता कमी झाल्या. एलएफसीन २५ या पेप्टाइडच्या वापराने पेशींचा सुनियोजित मृत्यू म्हणजे अॅपॉपटॉसिस ही क्रिया घडून आली. त्यानंतर अॅपॉपटॉसिसने कॅसपेजवर अवलंबून असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त पेशींवर हल्ला केला. ऑटोफॅगी म्हणजे पेशींच्या खराब झालेल्या भागांचा पुनर्वापर किंवा नाश तसेच अपॉपटॉसिस यांचा एलएफसीन २५ पेप्टाइडचा वापर करण्यात आलेल्या कर्करोगग्रस्त पेशींतील संबंध नेमका स्पष्ट करण्यात प्रथमच यश आले असल्याचे शेन यांनी सांगितले.