पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमचे केस लहान वयातच गळू शकतात. याशिवाय शरीरात आयर्न, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे लहान वयात केस गळण्याच्या तक्रारी होऊ शकतात. केस गळणे ही एक सामान्य समस्या असू शकते. केसांची वाढ आणि गळती टाळण्यासाठी काही जीवनसत्त्वे आवश्यक असतात.
केस गळणे ही एक अशी समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास होत असतो. सतत केस गळत असल्याने टक्कल कधी पडते हेच लक्षात येत नाही. यामुळे केस गळण्यापासून रोखणे आवश्यक आहे. केसांची गळती रोखण्यासाठी काही हेअर मास्क आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही केस गळती रोखू शकता. हे हेअर मास्क घरगुती पदार्थांपासून तयार केले जातात. तसेच ते केसांना लावणे देखील खूप सोपे आहे.
हेही वाचा : Health Tips: काय सांगता! व्यायामाशिवाय वजन कमी करता येते? ‘हे’ सोपे उपाय करून बघा
केळ्यां (Banana) चा हेअर मास्क
एकसारख्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रासला असाल तर केसांवर केल्याचा हेअर मास्क लावता येतो. केळ्यांपासून तयार केलेला हेअर मास्क हा केसांच्या मुळांना पोषण देतो. तसेच केस मऊ देखील करतो. सर्वात पहिल्यांदा २ केळी घ्यावी. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळावे. हे मिक्स करून केसांना लावावे. त्यानंतर २० मिनिटांनी केस धुवावेत. यामुळे केसांचे गळणे आणि तुटणे कमी होऊ शकते.
अंड्याचा हेअर मास्क
अंड्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला एक अंडे, २ चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा मध असे साहित्य लागणार आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मध न मिसळता देखील हेअर मास्क तयार करू शकता. एक भांड्यामध्ये अंडे घेऊन, खोबरेल तेल आणि मध एकत्रित करावे. हा हेअर मास्क १५ ते २० मिनिटे केसांवर लावावा. या मास्कमुळे केसांची वाढ होते तसेच केसांना प्रोटीन मिळते.
दही हेअर मास्क
दह्यामुळे केसांना प्रोटिन्स मिळते. दह्याच्या हेअर मास्कमुळे केसांमध्ये होणार कोंडा तसेच केस तेलकट होण्यापासून सुटका होते. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी दीड कप दह्यात एक चमचा मध आणि एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळावे. यानंतर तुमचा हेअर मास्क तयार होईल. हा हेअर मास्क किमान अर्धा तास आपल्या केसांवर लावावा व त्यानंतर केस धुवावेत.
कडी पत्त्याचा हेअर मास्क
कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या पानांमुळे केस पांढर्या होण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते. कढीपत्ता हेअर मास्क बनवण्यासाठी १० ते १५ कढीपत्त्याची पाने आणि २ चमचे खोबरेल तेल घ्यावे. खोबरेल तयार करून त्यात कढीपत्ता घालून शिजवावे. हे तयार झाल्यांनतर ते मिश्रण थोडे थंड झाल्यावर डोक्याला २० मिनिटे मसाज करावा. हे तेल आठवड्यातून दोन वेळा लावू शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)