‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’मधील भारतीय वंशाच्या कन्टेंट क्रिएटर शिवी चौहानने (Shivee Chauhan) नुकतेच इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये अन्न शिजवल्यानंतर मसाल्यांचा कपड्यांवर रेंगाळणारा सुगंध टाळण्याची तिची पद्धत सांगितली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारतीय खाद्यपदार्थांवर प्रेम व्यक्त करताना चौहान यांनी सांगितले की, कांदा, लसूण आणि मसाल्यांचा तिखट वास तिच्या कपड्यांना येतो, जो तिला आवडत नाही. व्हिडीओ शेअर करताना तिने, “भारतीय खाद्यपदार्थांचा वास कसा टाळावा”, अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओमध्ये चौहान यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वयंपाकासाठी वेगळे कपडे वापरण्याची शिफारस केली आहे.
“कांदा, लसूण आणि मसाल्यांचा वास स्वयंपाक करताना वापरलेल्या कपड्यांमधून येतो. त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना वेगळे कपडे वापरावेत आणि नेहमी ऑफिसमधून घरी परत येताच ऑफिसचे कपडे बदलून घेणे फायदेशीर आहे. मी बाहेर जाण्यापूर्वी माझे कपडेदेखील बदलते; जेणेकरून स्वयंपाकाचा वास येणार नाही,” असेही त्या म्हणाल्या.
पण, स्वयंपाक करताना कपडे बदलणे ही प्रथा आवश्यक आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्याबद्दल स्पष्टता मिळविण्यासाठी तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ…
स्वयंपाकघरातील दुर्गंधी कमी करणे
एक मल्याळम YouTuber आणि स्वयंपाकविषयक कन्टेंट क्रिएटर उषा मॅथ्यू यांनी स्वयंपाकघरात हातमोजे आणि अॅप्रन घालण्याच्या मताचे समर्थन केले. कारण- केवळ स्वच्छतेसाठीच नाही, तर नको असलेला वास कमी करण्यासाठीही असे करणे आवश्यक आहे.
“कांदा, लसूण किंवा मांस यांसारखे उग्र वासाचे घटक हाताळल्यानंतर लिंबाच्या रसाने हात धुतल्याने दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. अॅप्रनसारखे स्वयंपाकघरातील कपडे दररोज धुणेदेखील महत्त्वाचे आहे,” असे मॅथ्यू यांनी सांगितले
मॅथ्यू यांनी तीव्र वासांबद्दल संवेदनशीलता असलेल्यांसाठी कमी तिखटपणासह समान चव देण्याचा पर्याय वापरण्याची शिफारस केली. “ज्यांना नेहमीच्या लसणाचा रेंगाळणारा वास आवडत नाही, त्यांच्यासाठी हिरवा लसूण हा एक उत्तम पर्याय आहे,” असे त्या म्हणाल्या.
“स्वयंपाकाच्या जागेभोवती स्नेक प्लांट्स (snake plants) आणि मनी प्लांट्स किंवा पुदिना आणि तुळशीसारख्या औषधी वनस्पतींसारखी रोपे घरात ठेवल्यानेही दुर्गंधी दूर राहण्यास मदत होते. ही झाडे स्वयंपाकाच्या जागेतील गंध शोषून घेऊ शकतात,” असे मॅथ्यू म्हणाल्या आहेत.
हेही वाचा – चपाती किंवा भात वजन कमी करण्यासाठी कोणता पदार्थ चांगला आहे? आजच जाणून घ्या
स्वयंपाकघर ताजे ठेवते (Keeping the kitchen fresh)
मसालेदार भाज्यांमध्ये मसाले जास्त प्रमाणात वापरले जातात. स्वयंपाक करताना मसाले वापरण्यापूर्वी ते पाण्यात टाकून पातळ करावेत. भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर स्वयंपाक केल्याने मसाल्यांचा सुगंध येण्यास मदत होते. मांसाहारी पदार्थांसाठी त्यांनी मांस आणि मासे लिंबाच्या रसाने स्वच्छ करावेत किंवा स्वयंपाक करण्यापूर्वी किमान एक तास व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळलेल्या पाण्यात भिजवून घ्यावेत, असे त्यांनी सुचवले.
स्वयंपाक केल्यानंतर कपडे बदलणे ही वैयक्तिक पसंती असली तरी स्वयंपाकघरात स्वच्छता राखणे आणि साध्या तंत्रांचा अवलंब करणे यांमुळे वास कमी होऊ शकतो. एकंदरीत अशा रीतीने तुमचा स्वयंपाक करण्याचा आनंद वाढू शकतो.