सकाळी झोपेतून उठल्यानंतर तरतरी येण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी प्राशन करतो. चहा किंवा कॉफीचा अतिरेक आरोग्यासाठी चांगला नसला तरी प्रत्येकाला सकाळी सकाळी ही पेये लागतातच. चहा आरोग्यासाठी जास्त उपयोगी नसला तरी कॉफीमध्ये औषधी गुणधर्म आहे, हे वैद्यकीय तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. कॉफीप्राशन आपल्याला आतडय़ाच्या कर्करोगापासून दूर ठेवते, असा निष्कर्ष अमेरिकी शास्त्रज्ञांनी काढला आहे.
आतडय़ाच्या कर्करोगाचे उपचारानंतर निराकरण झालेल्या रुग्णाला तो पुन्हा उद्भवू नये यासाठी त्याने दररोज चार ते पाच कप कॉफीप्राशन करणे आवश्यक आहे. कर्करोगाने धोक्याची तिसरी पायरी (थर्ड स्टेज) गाठली असेल तर रुग्णावर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी हे उपचार केले जातात. मात्र अशा रुग्णावर कॉफीप्राशन हाही महत्त्वाचा उपचार ठरतो. अशा रुग्णाला दररोज चार ते पाच कप कॉफी दिल्यास कर्करोगाचे निराकरण होण्यास मदत होते, असे या शास्त्रज्ञांना वाटते. चार ते पाच कप कॉफीमधून ४६० मिलिग्रॅम कॅफिन शरीरात जाते आणि त्यामुळे कर्करोगाचे निराकरण होते, असे या शास्त्रज्ञांच्या पथकाचे प्रमुख चार्ल्स फिच यांनी सांगितले.
चार्ल्स फिच हे बोस्टन येथील कर्करोग केंद्राचे संचालक आहेत. त्यांच्या पथकाने एक हजार कर्करुग्णांवर अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. जे रुग्ण कॉफी पीत नाहीत, त्यांच्यापेक्षा जे नियमित कॉफीप्राशन करतात त्यांच्यामधील कर्करोग परतण्याची शक्यता ४२ टक्क्यांनी घटली होती. कॉफीप्राशन न करणाऱ्या अनेक रुग्णांना कर्करोग पुन्हा उद्भवल्याचे दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा