Black Tea Hair Benefits: काळा चहा हा कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या ऑक्सिडाइज्ड पानांपासून बनवलेले लोकप्रिय पेय आहे. आजही जगात अनेक ठिकाणी मसाला चहाऐवजी काळा किंवा कोरा चहा अधिक आवडीने प्यायला जातो. आरोग्यासाठी काळ्या चहाचे फायदे सर्वश्रुत आहेत पण आज आपण काळ्या चहाचा केसांसाठी होणारा फायदा जाणून घेणार आहोत. हेल्थलाईनच्या अहवालानुसार, आज आपण काळ्या चहाने केस धुण्याचे काही फायदे पाहणार आहोत, नेमकी ही प्रक्रिया कशी करावी? याचे काही दुष्परिणाम आहेत का हे सुद्धा आपण जाणून घेऊया..
काळ्या चहाचा केसांसाठी कसा फायदा होऊ शकतो?
केसांचा रंग गडद करण्यासाठी..
काळ्या चहामध्ये टॅनिनचे प्रमाण अधिक असते, हा एक प्रकारचा पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडेंट आहे जो फ्री रॅडिकल्स कमी करतो. काळ्या चहामध्ये थेफ्लाव्हिन्स आणि थेअरुबिगिन्स असतात, जे त्याला गडद रंग देतात. काळ्या चहाने केस धुतल्याने केसांचा रंग गडद होण्यास व राखाडी केस कमी होण्यास मदत होते. मात्र एक मर्यादा लक्षात घ्यायला हवी की हा उपाय केवळ काळ्या केसांसाठीच उपयुक्त आहे तसेच त्याचा प्रभाव फार दिवस टिकत नाही.
केसांची भरभर वाढ
चहामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि कॅफीन असल्याने टाळूची खाज कमी होऊन कोंड्याचे प्रमाण सुद्धा कमी होते, ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होऊ शकते. काळ्या चहामध्ये आढळणारे कॅफिन हे डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) या केस गळतीशी संबंधित हार्मोनचे प्रमाण कमी करू शकते. DHT केसाच्या कूपांना आकुंचित करते आणि केसांची वाढ खुंटते. यासंदर्भात झालेल्या अभ्यासानुसार, कॅफीन आणि टेस्टोस्टेरॉन केराटिनचे उत्पादन वाढवून केसाची वाढ वेगाने होण्यास मदत होऊ शकते. एका टेस्ट ट्यूबच्या अभ्यासात ०.२ % कॅफीन द्रावण वापरून असेच परिणाम दिसून आले होते मात्र हे संशोधन एका ब्रॅंडने प्रायोजित केले होते. त्यामुळे या संदर्भात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
काळ्या चहाने केस धुण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
केस आणि टाळूसाठी काळ्या चहाचा वापर केल्याने केसांमध्ये कोरडेपणा वाढू शकतो. कॅफिनमुळे केस कोरडे व खराब झालेले दिसून शकतात. हे टाळण्यासाठी स्प्रे बॉटल वापरून काळा चहा टाळूवर किंवा केसाच्या मुळांशी लावावा. तसेच केस धुतल्यावर कंडिशनर वापरणे फायद्याचे ठरू शकते. जरी काळा चहा केस धुण्यासाठी वापरण्याचे ठोस दुष्परिणाम नसले तरी कोणताही प्रयोग करण्याआधी पॅच टेस्ट करणे कधीही उत्तम.
पॅच टेस्ट करण्यासाठी काय करावे?
आपल्या हाताच्या आतील बाजूस किंवा हाताच्या वरच्या भागावर थोडा वेळ थंड काळा चहा ठेवा. २४ तासांनंतर, लालसरपणा, त्वचेचा रंग खराब होणे किंवा जळजळ होण्याची चिन्हे तपासा. यापैकी कोणतीही चिन्हे दिसल्यास, काळ्या चहाने केस धुणे पूर्णपणे टाळा.
काळ्या चहाने केस कसे धुवावे?
दोन पेले पाणी उकळून घ्या. गॅस बंद करून मग त्यात तीन ते चार चहाच्या बॅग/ दोन चमचे चहा पावडर घालून किमान 1 तास किंवा पाणी साधारण थंड होईपर्यंत भिजवून ठेवा .
काळ्या चहाला स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा
एकदा केस स्वच्छ धुवून घ्या व मग काळ्या चहाचा स्प्रे केसाच्या मुळाशी करा
तुमचे केस ओलसर असताना, तुमचे केस लहान भागात वेगळे करा आणि टाळूवर चहा स्प्रे करा. हलक्या हाताने मसाज करा.
३० ते ६० मिनिटे केस बांधून झाकून ठेवा. यासाठी मऊ टीशर्ट किंवा शॉवर कॅप वापरा.
तासाभराने केस थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि डीप कंडिशनर वापरून पुन्हा धुवून घ्या.
जर तुम्ही तुमच्या केसांचा रंग गडद करण्यासाठी काळा चहा वापरत असाल, तर चहाचा स्प्रे केसाच्या मुळाजवळ करा. जर तुम्ही केसांच्या वाढीसाठी ते वापरत असाल, तर तुमच्या टाळूवर जास्त लक्ष केंद्रित करा.
हे ही वाचा << तिखट पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्स, पुरळ वाढतात की होते मदत? तज्ज्ञांनी सोडवला मोठा प्रश्न, लक्षात घ्या की..
लक्षात घ्या: कुपोषण, तणाव, हार्मोन्स, अनुवंशिकता आणि केसांचे नुकसान यासह केस गळण्याची अनेक कारणे आहेत. केस गळतीची समस्या सोडवण्यासाठी काळ्या चहावर अवलंबून राहण्याऐवजी, तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.