पालकांनो, तुमच्या मुलांनी चांगला अभ्यास करावा असे तुम्हाला वाटते? मग त्यांना दुपारी थोडा वेळ झोपू द्या.
दिवसा घेतलेल्या तासाभराच्या झोपेमुळे मुलांच्या स्मरणशक्तीत सुधारणा होऊन त्यांच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेत वाढ होत असल्याचे प्रथमच अशाप्रकारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
मॅसेच्युसेट विद्यापिठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिवसा घेतलेल्या तासाभराच्या झोपेमुळे लहान मुलांच्या स्मरणशक्तीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले. मानसशास्त्रज्ञ रिबेका स्पेन्सर म्हणाल्या की, त्यांनी कासेय डुकलोस आणि लॉरा कुर्डझेल या त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या केलेल्या पहाणीत, लहान मुलांच्या स्मरणशक्तीच्या वाढिसाठी आणि चांगल्या अभ्यासासाठी दिवसाची वामकुक्षी अतिशय गरजेची असल्याचे दिसून आले.
स्पेन्सर पुढे म्हणाल्या, दुपारच्या झोपेमुळे पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये प्रगती होत असल्याचे पुरावे सादर करणारे आम्हीच पहिले असून, दुपारच्या झोपेमुळे पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांना शाळेत शिकवलेले चांगल्याप्रकारे लक्षात राहण्यास मदत होत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. या सर्वेक्षणासाठी स्पेन्सर आणि त्यांच्या अन्य सहका-यांनी मॅसेच्युसेटच्या पश्चिम विभागातून सहा पूर्व प्राथमिक शाळेतील ४० मुलांची निवड केली होती.
या ४० मुलांबरोबर स्मरणशक्तीचा एक खेळ खेळण्यात आला. दोन टप्प्यात खेळण्यात आलेल्या या खेळात मुलांना दोन अटी घालण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात मुलांना काही काळासाठी झोपण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी सरासरी ७७ मिनिटे झोपेचे प्रमाण नोंदविण्यात आले. दुस-या टप्प्यात मुलांना झोपण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
झोपायला दिल्यानंतर आणि झोपायला दिले नसतानाच्या स्थितितील स्मरणशक्तीच्या नोंदी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे रात्रीच्या झोपेचा काही परिणाम होतो का हे पहाण्यासाठी दुस-या दिवशीच्या सुध्दा नोंदी काढण्यात आल्या.
ज्यावेळी मुलांनी झोप घेतली नव्हती त्यावेळच्या त्यांच्या स्मरणशक्तीत कमालीची घसरण झाल्याचे दिसून आले. या वेळी त्यांची नोंदवली गेलेली उत्तरे ६५ टक्के बरोबर होती, तर दिवसा थोड्या वेळासाठी झोप घ्यायला दिल्यानंतरची नोंदवलेली उत्तरे ७५ टक्के बरोबर होती. यावेळी त्यांच्या स्मरणशक्तीने चांगले काम केले होते. दिवसा थोड्यावेळासाठी झोप काढल्यावर त्यांच्या स्मरणशक्तीत १० टक्क्यानी वाढ झालेली आढळून आली. ह्या सर्वेक्षणाचा अहवाल नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सच्या नियतकालिकात प्रसिध्द करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा