स्वाइन फ्लूमुळे भारतात या वर्षी १ हजार ९४ जणांचा मृत्यू झाला असून २२ हजार १८६ जणांना या आजाराची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रात या आजारामुळे सर्वाधिक ४३७ जणांचा मृत्यू झाला असून गुजरात (२६९), केरळ (७३) आणि राजस्थान (६९) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. २०१६मध्ये भारतात स्वाइन फ्लूमुळे २६५ जणांचा मृत्यू झाला होता. तर १ हजार ७८६ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. २० ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात ४ हजार २४५ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे. त्यामागे गुजरात (३,०२९), तमिळनाडू (२,९९४) आणि कर्नाटक (२,९५६) या राज्यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्ये १ हजार ७१९ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये ३४२ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून मागील वर्षी याच कालावधीत केवळ सहा जण दगावले होते. २००९-१० या वर्षी स्वाइन फ्लूमुळे देशात तब्बल २ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हजार जणांना या आजाराची बाधा झाली होती.