कर्मचाऱ्यांची कामाशी असलेली भावनिक संलग्नता आरोग्य सुधारण्यास मानसशास्त्रीयदृष्टय़ा लाभदायक ठरत असल्याचे आत्ताच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
संस्थेशी असलेली भावनिक संलग्नता कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवते व त्यामुळे कामाचा वेगही वाढतो व कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यात संस्थेला मदत होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. भावनिक संस्थात्मक बांधिलकी म्हणजे कर्मचाऱ्याची संस्थेशी असलेला भावनिक बंध, कर्मचाऱ्याचा संस्थेतील सहभाग हीच त्याची ओळख ठरते.
डॅनिश नॅशनल रिसर्च सेंटरचे थॉमस क्लॉसेन यांनी सहकाऱ्यांसह ५००० कर्मचाऱ्यांवर संशोधन केले. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर भावनिकतेचा कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांची संस्थेशी अधिक प्रमाणात भावनिक संलग्नता असेल तर अशक्तपणा, झोप न लागणे असा त्रास कर्मचाऱ्यांना होत नाही, असेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱ्यांची संस्थेशी असलेली सांघिक भावनिक संलग्नता आणि मानसिक आरोग्य यांचा परस्परसंबंध या अभ्यासात स्पष्ट करण्यात आला आहे.
याआधी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कर्मचाऱ्यांची भावनिक संलग्नता त्यांना सातत्याने कार्यात मग्न ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे सुट्टी घेण्याचे प्रमाणही आपोआपच कमी होते. संस्थेशी वैयक्तिक पातळीवर कर्मचाऱ्यांची बांधिलकी असतेच मात्र सांघिक पातळीवरही अशीच बांधिलकी निर्माण झाल्यास त्याचा संस्थेला आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही लाभ होतो.