Deepika Padukone Love Life Advice: दीपिका पदुकोण ही सर्वात चर्चेतील ग्लोबल स्टार आहे. चित्रपटांमध्येच नाही तर मानाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पण अलीकडेच, तिने ‘लव्ह गुरु’ बनून सल्ले देत चाहत्यांना आपली एक वेगळीच बाजू दाखवून दिली आहे. रणवीर व दीपिकाच्या नात्यातील गोडवा हा अनेकांना आकर्षित करतो. रणबीर कपूरशी असलेले रिलेशन संपल्यावर अनेकदा दीपिकाची हळवी बाजू चाहत्यांनी पाहिली होती पण २०१८ मध्ये रणवीर सिंहशी लग्न झाल्यावर दीपिकाच्या चेहऱ्यावर कायम आनंद व उत्साह दिसून येत असल्याचे अनेक चाहते म्हणतात. याच नात्याला टिकवून ठेवण्यासाठी रणवीर व दीपिका काही नियम नेटाने पाळतात याविषयीच दीपिकाने अलीकडे एका मुलाखतीत माहिती दिली होती.
दीपिका पदुकोण म्हणते, आपला प्रवास वेगळा…
टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, दीपिकाने सांगितले की, “प्रत्येक नाते वेगळे आहे आणि म्हणूनच त्याची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. मला वाटते की आपण सर्वजण चित्रपटांच्या तसेच आपल्या आजूबाजूला पाहत असणाऱ्या नात्यांच्या प्रभावाखाली मोठे होतो. पण लग्न आणि आयुष्याचा प्रवास हा आपण स्वतः व आपला जोडीदार या दोघांचाच असतो. तसंच, जोडीदार आणि आपण स्वतः या दोन वेगळ्या व्यक्ती आहोत आपला प्रवासही वेगवेगळा आहे ही गोष्ट आपण जितक्या लवकर मान्य कराल तितकं चांगलं आहे,”
रोमँटिक नात्यांमध्ये सगळ्यात आवश्यक काय आहे यावर उत्तर देताना पुढे दीपिका म्हणते की “माझे आई-वडील किंवा त्या संपूर्ण पिढीकडून एक गोष्ट मी शिकलेय ती म्हणजे संयम खूप आवश्यक आहे. फक्त रणवीर आणि मीच नाही तर आमच्यासारखी इतर जोडपी सुद्धा आधीच्या पिढीकडून अनेक गोष्टी शिकू शकतात पण त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम.”
दीपिका पदुकोणच्या या सल्ल्यावर, फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञ कामना छिब्बर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “नात्यातील दोन व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व, अनुभव, वर्तन, गुणधर्म, सामर्थ्य आणि कमतरता या एकमेकांपेक्षा भिन्न असतात. म्हणूनच, एका जोडप्यासाठी जी गोष्ट बेस्ट ठरतेय ती दुसऱ्या जोडीसाठीही फायद्याची असेलच असे नाही.”
हे ही वाचा<< Video: दीपिकाने कंगनाला एका वाक्यात असा टोमणा मारला की… फॅन्ससह विद्या बालनही हसून झाली हैराण
“धीर धरल्याने समज आणि दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होते. यामुळे संघर्ष कमीत कमी राहतो आणि दोन लोकांमधील मतभेद अधिक चांगल्या प्रकारे हाताळले जाऊ शकतात. धीर धरणे, विश्वास आणि आदर कायम ठेवणे, संवाद वाढवणे, ऐकण्याचे कौशल्य विकसित करणे, अनुभव शेअर करणे, व काहीवेळा नाकारणे सुद्धा महत्त्वाचे असते. “