कामाशी संबंधित तणावामुळे व इतर चिंतांमुळे दिल्लीतील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे धुम्रपान, मद्यपान व इतर अनारोग्यदायी अशा जीवनशैलीकडे ते वळत आहेत, असा निष्कर्ष एका अभ्यासात काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी अरबट-चरबट खाण्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याचा दावाही या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये मध्ये हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. तसेच बैठय़ा जीवनशैलीमुळे हृदयविकाराशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.

मॅक्स हेल्थकेअरने दिल्लीतील २० ते ६० वयोगटांतील नागरिकांकडून प्रश्नावली भरून घेतली. त्यात सुमारे एक हजार जणांकडून बदलती जीवनशैली, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबतचा अभ्यास करण्यात आल्याचे मॅक्सकडून सांगण्यात आले. यात ४४ टक्के महिला तर ३२ टक्के पुरुष धूम्रपान करत असल्याचा दावाही सर्वेक्षणात आहे. त्यातही २१ ते ३० वयोगटांतील ३५ टक्के व्यक्ती तर ३१ ते ४० या वयोगटांतील २५ टक्के व्यक्तींना दिवसाला सिगारेटचे एक पाकीट लागते असे सर्वेक्षणात दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

एकूण जीवनात समाजमाध्यमे व तंत्रज्ञानानाने घुसखोरी केली आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. निम्म्या दिल्लीकरांना नियमित झोप मिळत नाही असे सर्वेक्षण सांगते. दिल्लीसारख्या महानगरांमध्ये तणाव हा जीवनाचा एक भागच बनला आहे. महिलांनाही त्याचा तितकाच फटका बसत आहे असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजीव राठी यांनी स्पष्ट केले.