दिवसातला बराच वेळ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) घालवणाऱ्या सध्याच्या युवा पिढीतील मुलींमध्ये यामुळे नैराश्याची लक्षणे निर्माण होण्याची शक्यता याच वयाच्या मुलांच्या तुलनेत दुप्पट असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

समाजमाध्यमे आणि नैराश्याची लक्षणे यांच्यातील परस्परसंबंधांचा वेध घेणारा हा पहिलाच अभ्यास असल्याचा दावा केला जात आहे. त्याचे निष्कर्ष ‘ई-क्लिनिक मेडिसीन’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.

हा अभ्यास करताना इंग्लंडमधील ‘युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन’च्या संशोधकांनी सुमारे ११ हजार युवकांविषयीच्या माहितीचे विश्लेषण केले. समाजमाध्यमांचा वापर करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे १४ वर्षीय मुलींमध्ये असल्याचे यात दिसून आले. यातील दोनपंचमांश मुली या दिवसात तीन तासांहून अधिक काळ समाजमाध्यमांवर घालवतात. त्या तुलनेत समाजमाध्यमांत रममाण होणाऱ्या मुलांचे प्रमाण एकपंचमांश असल्याचे निष्पन्न झाले.

समाजमाध्यमांचा वापरच न करणाऱ्या मुलींचे प्रमाण केवळ चार टक्के, तर मुलांचे १० टक्के असल्याचे या अभ्यासातून समजले. समाजमाध्यमांचा माफक वापर करणाऱ्या १२ टक्के युवकांमध्ये तसेच या माध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करणाऱ्या (दिवसाला पाच किंवा अधिक तास) ३८ टक्के व्यक्तींमध्ये अधिक तीव्र नैराश्याची लक्षणे आढळल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे.

याबाबत ‘युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन’चे प्राध्यापक युव्होन केली म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर आणि नैराश्याची लक्षणे यांच्यातील संबंध मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त दिसून येतो. मुलींच्या बाबतीत त्या दिवसातून समाजमाध्यमांवर जितका जास्त वेळ घालवतात, त्या प्रमाणात त्यांच्यातील नैराश्याची लक्षणे वाढत जातात. मुलांच्या बाबतीत, जे दिवसाचा तीन तास किंवा अधिक वेळ समाजमाध्यमांवर असतात, त्यांच्यात नैराश्याची अधिक लक्षणे दिसतात. समाजमाध्यमे आणि नैराश्यातील संबंधाचा कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला तेव्हा इंटरनेटवरून छळणूक (ऑनलाइन हॅरॅसमेंट, सायबर बुलिंग) झाल्याचे प्रकार ४० टक्के मुली आणि २५ टक्के मुलांनी अनुभवल्याचे स्पष्ट झाले.

 

Story img Loader