सौजन्य –
साधारण दोन दशकांपूर्वीचा काळ.. दिवाळीच्या आधीचा असाच बाजारपेठ फुलण्याचा काळ.. स्त्रियांच्या कपडय़ांच्या दुकानांतून प्रकर्षांने दिसणाऱ्या दोनच फॅशन.. एक – पांढऱ्या आणि पोपटी रंगाचा लेहंगा -चोली आणि दुसरी – लीलालेसचा लाल फ्रॉक. आत्ता वयाच्या पस्तीशीत असणाऱ्या सगळ्या मुलींना त्या वर्षी दिवाळीच्या खरेदीत आणि नंतरही ही फॅशन नक्कीच आठवत असेल. काहींना घेण्याचा मोहही झाला असेल कदाचित. कारण साक्षात माधुरी दीक्षितने तसे कपडे घातले होते ना..चित्रपट अर्थातच हम आपके है कौन! फॅशनवर त्या वेळी असाच जबरदस्त पगडा होता तो चंदेरी पडद्याचा. त्यावरच्या नट- नटय़ांचा.
आत्ता साठीत असलेल्या स्त्रियांनी त्यांचा तरुणपणचा काळ आठवला तर लक्षात येईल.. एखादी बॉब कट केलेली मुलगी असेल तर ती त्या काळी फॅशनेबल वाटायची. देवआनंदसारखा केसांचा कोंबडा काढायची फॅशन असो किंवा ‘साधना’कट, फॅशन म्हणजे नट- नटय़ांची हुबेहुब नक्कल, असाच काहीसा समज अगदी आत्तापर्यंत होता. माध्यमांचा आवाका अगदीच थोडा होता त्या काळात. त्यामुळे फार थोडय़ा लोकांना एल्व्हिसचा केसांचा कोंबडा माहिती होता. त्याहून कित्येक पट अधिक देवआनंदच्या हेअरस्टाईलचे फॅन होते. हळूहळू हिंदी सिनेमातील का होईना पण फॅशन सामान्य माणसांमध्ये रुळायला लागली. मुंबईसारख्या महानगरामध्ये मात्र फॅशन सुरुवातीपासून जगण्याचा भाग होती. इथल्या मोठमोठ्या हॉटेल्समधून, उच्चभ्रू
टीव्ही आला आणि थोडे चित्र बदलले. सॅटेलाईट टीव्हीबरोबर जगात काय सुरू आहे, याचे थेट चित्र दिसायला लागले आणि हळूहळू बदल दिसला.
भारतीय अर्थव्यवस्था मुक्त झाली त्या वेळी माध्यमक्रांतीलाही सुरुवात झालेली होती. या सगळ्याचाच एकत्रित परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर होत गेला. आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारतीय बाजारपेठेत सर्रास दिसू लागले ते याच सुमारास. या ब्रँडेड वस्तूंचा वापर आणि त्याबाबतची माहिती मात्र तरीही ठराविक वर्गापुरती मर्यादित असायची. अगदी नव्या सहस्रकाच्या सुरुवातीनंतरही ग्लोबल ब्रँड्सचे सर्वसामान्यांना फार अप्रूप होते. नट- नटय़ांच्या मुलाखतींमधून त्या ब्रँड्सची नावे ऐकायला यायची पण ते किंवा तसे ब्रँड्स आपल्यासाठी असतील, असे काही कधी सामान्यांना वाटले नव्हते. गेल्या पाच- सहा वर्षांत मात्र आमूलाग्र बदल झालेला दिसतो आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कचे हायस्ट्रीट ब्रँड्स मुंबई- पुण्यात दिसायला लागले आहेत. झपाटय़ाने होणाऱ्या जागतिकीकरणाचा परिणाम म्हणजे आता बाजारपेठेचे स्वरूपच जागतिक व्हायला लागले आहे. मुंबईच्या एखाद्या आलिशान शॉपिंग मॉलमधून फिरताना आसपास दिसणारी ब्रँडेड नावे बघून आपण भारतात आहोत की आणखी कुठल्या पाश्चिमात्य देशात असा प्रश्न पडावा, इतके वातावरण बदललेले आहे.
आंतरराष्ट्रीय ब्रँडबरोबरच कधी नव्हे एवढे देसी ब्रँडही बाजारात दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय डिझायनर्सनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाव कमावले आहे. आता मुंबईसारख्या शहरात महिन्यातून अनेक फॅशन शो होतात. फॅशन इंडस्ट्री खऱ्या अर्थाने इंडस्ट्री झाली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात फॅशन आली आहे ती यातील स्पर्धेमुळे. फॅशन शोच्या रँपवरची फॅशन आता खिशाला परवडेल इतके खिसेही गरम व्हायला लागले आहेत. त्यामुळे फॅशन आता ठराविक वर्गाची मक्तेदारी नक्कीच राहिलेली नाही. यासंदर्भात बोलताना आघाडीच्या फॅशन डिझायनर अनिता डोंगरे म्हणाल्या, ‘फॅशन फक्त ठराविक वर्गापुरती मर्यादित होती तो काळा आता गेला. माध्यमक्रांती झाली तशी माध्यमांबरोबर फॅशनही घराघरात पोचली. आता इंटरनेटसारख्या माध्यमामुळे जागतिक फॅशन काय आहे, ट्रेंड्स कुठले आहेत हे छोटय़ा शहरात राहणाऱ्या तरुण पिढीलाही लगेच समजते. महानगरासाठी वेगळी फॅशन आणि छोटय़ा शहरांत वेगळी असे आता राहिलेले नाही. रँपवरची फॅशन परवडणारी असावी, असाही त्यामुळे निकष निर्माण झाला आहे. मी नेहमीच या अॅक्सेसिबल फॅशनमध्ये विश्वास ठेवलाय.’ अनिता डोंगरे यांचे ग्लोबल देसी
आंतरराष्ट्रीय ब्रँड्स ते लक्झरी ब्रँड्स
अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारतात यायला लागले आहेत. एचअँड एम, एमअँडएस हे लंडनच्या हाय स्ट्रीटवरचे प्रसिद्ध ब्रँड मुंबईत आले आहेत. नुकताच न्यूयॉर्कचा फॉरएव्हर २१ हा ब्रँडही आला आहे. हे सगळे परदेशातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचे ब्रँड समजले जातात. ते आता भारतीय मध्यमवर्गही स्वीकारत आहे. अविराते हा ब्रिटीश ब्रँड दोन वर्षांपूर्वी भारतात आला. अविराते इंडियाचे प्रमुख जाहीद उस्मान यासंदर्भात म्हणाले, ‘ग्लोबल लाईफस्टाईलचा प्रभाव भारतीय जीवनशैलीवर पडायला लागला आहे. भारतीय मध्यमवर्गीय स्त्रियाही आता ब्रँड कॉन्शस झाल्या आहेत. मध्यमवर्ग फिरायला म्हणून परदेशात जातो. तिथे वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट्स बघतो, ती खरेदी करतो आणि त्यांच्या अपेक्षा उंचावतात. हाय स्ट्रीट फॅशन आपल्याकडेही उपलब्ध असावी, असे त्याला वाटते. या उंचावणाऱ्या अपेक्षांनुसार आणि भारतीय बाजारपेठेचा वाढणारा आवाका लक्षात घेता अनेक परदेशी रिटेल ब्रँड भारतात यायला लागले आहेत.’ अविराते हा मूळचा ब्रिटीश ब्रँड २०११ मध्ये भारतात आला. मुंबई, बंगलोर, पुण्यानंतर आता दिल्ली, चेन्नईबरोबरच आता ठाणे, अमृतसर, चंदीगढ, जालंधर, लुधियाना, गुवाहाटी येथे अविरातेची स्टोअर्स उघडणार आहेत.
उच्चभ्रू समाज पूर्वीदेखील ब्रँडेड वस्तूंबाबत जागरुक होता आता त्यांचा कल लक्झरी ब्रँड्सकडे वळला आहे. त्यांची खर्च करण्याची तयारी आहे आणि इच्छा आहे हे पाहिल्यावर आता अनेक आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्स आपल्या देशात दुकाने उघडायला आल्याचे दिसते. विशेषत नवश्रीमंत तरुणाईमध्ये आणि उच्चभ्रू वर्तुळांमध्ये सध्या या लक्झरी ब्रँड्सची चलती असते. प्रादा, बरबरी, गुची, रोलेक्स, जिम्मी शू, अरमानी ही नावे आता या वर्गात अगदी नेहमीची झाली आहेत. सर्वसामान्यांना परवडतील असे ग्लोबल ब्रँड्स आणि लक्झरी ब्रँड्स असे सरळ दोन भाग आता या बाजारपेठेत पडल्याचे दिसते. महानगरातील कुठल्याही मोठय़ा मॉलमध्ये आता या प्रादा, रोलेक्स, अरमानीच्या शोरूम हमखास दिसतात. एमअँडएस, लीवाईज, आदिदास, नायके, व्ॉन ह्य़ुसेन अशा स्टोअरमधून तर मध्यमवर्गीय गर्दी दिसू लागली आहे.
शहरातून गावाकडे
या बदललेल्या वातावरणामुळे, मॉलसंस्कृतीमुळे एक गोष्ट झाली आहे हे नक्की. मुंबई, बँकॉक, हाँगकाँग, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क कुठेही गेलात तरी सारखाच ‘शॉपिंग एक्स्पिरियन्स’ मिळणार हे उघड आहे. त्या त्या ठिकाणचा स्थानिकपणा (लोकल फ्लेवर) हरवत चालला आहे. नेमकी हीच गोष्ट भारतीय डिझायनर्सनी आता हेरलेली दिसते आहे. एक तर मोठय़ा शहरातील बाजारपेठ आता त्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत विस्तारली गेलेली आहे. यापुढे विस्ताराची जागा आहे ते निमशहरी भागात आणि नंतर ग्रामीण भागात.
अनिता डोंगरे म्हणाल्या, ‘फक्त महानगर ही आता डिझायनर वेअरची मर्यादा राहिलेली नाही. देशातील ४० लहान – मोठय़ा शहरांमध्ये १८० स्टोअर्समध्ये आमचे ब्रँड्स उपलब्ध आहेत. महानगरी, शहरी, निमशहरी भागासाठी काही वेगळी फॅशन, वेगळी डिझाईन्स बनवता का असे विचारल्यावर अनिता म्हणाल्या की, त्यांची कुठलीच स्टाईल किंवा डिझाईन हे ठराविक वर्गापुरते मर्यादित असे बनवत नाही आणि आता असे करण्याची गरजच वाटत नाही. फॅशनबाबत जागरुकता सगळीकडेच सारखी दिसते. छोटय़ा शहरातील मुलीसुद्धा इंटरनेट, ब्लॉग्ज, टीव्ही, चित्रपट या माध्यमातून नवीन, लेटेस्ट फॅशनबाबत माहिती घेत असतात. त्यांनाही आता तशीच फॅशन लागते. शहरी फॅशन गावात पोचायला आता अजिबात वेळ लागत नाही.’
या वर्षीच्या मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये एक दिवस पारंपरिक हातमागासाठी राखून ठेवण्यात आला होता. सौमित्र मंडल आणि श्रुती संचेतीने या वेळी खास पारंपरिक बाजाची तरीही आधुनिक म्हणता येतील अशी डिझाईन्स सादर केली. श्रुतीने महाराष्ट्राच्या पैठणीला रँपवर आणले. त्यासाठी तिने काही पैठणी कारागिरांबरोबर काम केले होते. ‘भारताच्या ग्रामीण भागात खूप सुंदर कला आहे. आजपर्यंत ती पारंपरिक म्हणून मागे पडत होती. पण आता त्याच परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याची वेळ आली आहे. ’, श्रुती म्हणते. पैठणीला आजही तितकीच मागणी असली, तरी त्याची बाजारपेठ अगदी मर्यादित आहे. नव्या पिढीतील कारागीर आता त्याच त्या बाजारपेठेतून मिळणाऱ्या मर्यादित मूल्याकडे पाठ फिरवून वेगळ्या व्यवसायाला लागण्याची चिन्हे आहेत. त्याच वेळी आता फॅशनचे वारे ग्रामीण भागाच्या दिशेने वळल्यामुळे डिझायनर्सचे लक्ष त्याकडे गेले आहे. सौमित्र मंडल यांनी असेच पारंपरिक हातमागाला फॅशनचा रँप मिळवून देण्याचे काम केले आहे. या डिझायनरने लॅक्मे फॅशन वीकमध्ये ओडिसा आणि बंगालच्या हातमाग कारागिरांच्या मदतीने साकारलेले कलेक्शन सादर केले. सौमित्र म्हणतो, ‘पारंपरिक भारतीय हातमाग कला खूपच कलात्म आहे. बंगालच्या जामदनी वीणकामाच्या परंपरेचा अभ्यास करताना मला जाणवले की, त्यांच्या कापडाला खूप रिचनेस आहे. आपल्या या पारंपरिक कापडाला परदेशातूनही मागणी येऊ शकते.’ सौमित्रने ६० ते ६५ बंगाली वीणकरांबरोबर काम केले. हे वीणकरही आता आपला पारंपरिक व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेखाली होते. पण त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळाले तर चित्र बदलेल, असा आशावाद आता सौमित्रला वाटतो आहे.
आघाडीचा डिझायनर विक्रम फडणीसने गेल्या वर्षी असेच ग्रामीण भागातील पारंपरिक फॅशनपासून प्रेरणा घेऊन रुरल इंडिया हे कलेक्शन सादर केले होते. त्याच्या या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राजस्थानी परंपरेतील डिझाईन्स नव्या ढंगात सादर केली होती. विक्रमला याबाबत बोलते केले असता तो म्हणाला, ‘भारतीय फॅशन ही नेहमीच वेगळी आहे. आपण का म्हणून नेहमी वेस्टर्न फॅशनला प्रमाण मानून काम करत राहायचे? भारतीय फॅशनची आपली अशी एक ओळख आहे. आपली आणि परदेशातील फॅशन यांची तुलना करण्याची काहीच आवश्यकता नाही.’
या सगळ्यातून एक स्पष्ट होते की, फॅशनचे वारे आता शहराकडून गावाकडे वाहायला लागले आहेत. महानगरातील बाजारपेठ काबीज केल्यानंतर आता पुढचे लक्ष्य भारतीय निमशहरी आणि ग्रामीण भाग आहे, हे कदाचित सगळ्याच उद्योगाला जाणवेल आणि मग खऱ्या अर्थाने फॅशन सर्वसामान्यांपर्यंत पोचेल. हे चांगले की वाईट, योग्य की अयोग्य याची चर्चा करण्यात अर्थ नाही. पण माध्यमक्रांतीनंतर आता फॅशनक्रांती येणार हे निश्चित.
फॅशनचा ‘शुद्ध देसी’ फंडा!
सुरुवातीला फक्त सिनेमापुरती मर्यादित असलेली फॅशन प्रत्यक्ष आयुष्यात आली, पण ती ठराविक काळापुरतीच मर्यादित राहिली. आर्थिक सुधारणांच्या बरोबरीने माध्यमक्रांती झाली तेव्हा ही फॅशन सर्वसामान्यांपर्यंत पोचली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-10-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi fashion