अनुवांशिकतेमुळे ज्यांच्या कमरेखालील भागात (पाश्र्वभाग) अतिरिक्त चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी असते, त्यांना दुसऱ्या प्रकारचा (टाईप-२) मधुमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
सफरचंदाच्या आकाराचे शरीर (अॅपल शेप बॉडी) हे मधुमेह आणि हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीचे लक्षण असल्याचे आधीपासूनच मानले जाते. अशा प्रकारच्या शरीराच्या आकाराबाबत आणि त्याच्याशी निगडित जोखमीला कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियेविषयी या अभ्यासातून अधिक माहिती मिळत आहे.
या अभ्यासाचे निष्कर्ष ‘दी जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ (जामा)मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये हे रोग होण्याची शक्यता आणि त्यावरील उपचारांबाबत माहिती देण्यास या संशोधनाची मदत होणार आहे.
इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. त्यांनी यासाठी सहा लाखांहून अधिक व्यक्तींच्या जनुकीय माहितीचे विश्लेषन केले. इंग्लंडप्रमाणेच अन्य देशातील व्यक्तींचा यात समावेश आहे.
या प्रयोगात संशोधकांनी दोन विशिष्ट प्रकारच्या जनुकांचा गटांचा शोध लावला. या दोनही गटांतील जनुक कमरेचे पाश्र्वभागाशी असलेल्या आकाराचे प्रमाण वाढवण्याशी निगडित आहेत. एक गट कमरेखालील भागाच्या चरबीतून, तर दुसरा गट कमरेवरील पोटाच्या भागातील चरबीतून हे प्रमाण वाढवतो. या दोन्ही प्रकारची जनुके ही दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याशी निगडित असल्याचे दिसून आले, अशी माहिती केंब्रिज विद्यापीठीतील क्लाऊडिया लॅन्जेनबर्ग यांनी दिली.