मधुमेह (Diabetes) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. जगभरात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वेगाने वाढ होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सकाळी प्रत्येकाला नाश्ता करण्याची सवय असते, वाट्टेल ते आणि मिळेल तसं अन्न पदार्थ खाण्याच्या चुकीच्या सवयींनी मधुमेहाचे प्रमाण वाढतच आहे. इतकंच नव्हे, तर खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव हे सुद्धा त्याचे कारण म्हणता येईल. भारतात या आजाराचे ७७ दशलक्ष रुग्ण आहेत. चिंतेची बाब म्हणजे, आता कमी वयातच लोकांना मधुमेह होत आहे. मात्र, काळजी करू नका, जिथे अडचणी आहे त्यावर उपाय देखील आहेतच. तुम्ही ‘या’ अमृततूल्य टिप्स फॉलो केल्या तर डायबिटीजला टाटा बाय बाय करता येईल.
डायबिटीजचं डाएट आधी समजून घेऊया
मधुमेहामध्ये रक्तातील साखर वाढते. टाइप 2 मधुमेहामध्ये, रक्तातील साखर पचवण्यासाठी कमी इन्सुलिन हार्मोन तयार होतो. जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन कमी होऊ लागते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. वास्तविक, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्यात कर्बोदके असतात. पोटात कार्बोहायड्रेटचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. हे ग्लुकोज तुटून ऊर्जेत रूपांतरित होते आणि या उर्जेने आपण कोणतेही काम करतो. पण कार्बोहायड्रेट्स पचवण्याचे काम स्वादुपिंडात तयार होणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकाद्वारे केले जाते, परंतु जेव्हा हा हार्मोन कमी तयार होतो किंवा अजिबात तयार होत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. साखरेच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे किडनी, हृदय आणि डोळ्यांचे गंभीर आजार होतात. म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी थेट रक्तातील साखरेशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, नाश्त्यामुळे आपण काही गोष्टी खातो ज्यामुळे रक्तातील साखर आणखी वाढते.
डायबिटीजच्या रूग्णांनी नाश्त्यात खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ
- मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात कोणत्याही प्रकारचा ज्यूस पिऊ नये. याशिवाय चहा, कॉफी, चॉकलेट्स, पेस्ट्री, प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश करू नये.
- साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये बहुतेक साखर आणि कर्बोदके असतात. त्यामध्ये कोणतेही पौष्टिक घटक फार कमी प्रमाणात असतात. गोड पदार्थ शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतात. साखरेमुळे वजन वाढणे, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. मधुमेहाच्या रुग्णाने साखरयुक्त पदार्थ आणि कार्बोहायड्रेट खाणं टाळावं.
- पांढरा ब्रेड मैद्यापासून बनविला जातो, जो परिष्कृत स्टार्चने भरलेला असतो. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यात फायबरचीही कमतरता असते.
‘हे’ फॉलो करा आणि मधुमेह टाळा
१. नाश्त्यात प्रथिने वाढवा
अनेकजण उपलब्ध असलेला नाश्ता करतात. मात्र, पौष्टिक अन्नपदार्थ खाणे कधीही चांगले. उदा. नाश्त्यामध्ये अंडी, दूध, मसूर, पालक इत्यादींचा समावेश जरूर करा. प्रोटीनशिवाय आपले शरीर अपूर्ण आहे.
२. पौष्टिक ज्यूसचे सेवन करा
बहुतेक लोक नाश्त्यात ज्यूसचे सेवन करतात पण ज्यूसमधून फायबर निघून जाते त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. यासोबतच ज्यूसमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे ज्यूसऐवजी फळांचे अधिक सेवन करा.
(हे ही वाचा : अंड्यांसोबत ‘हे’ पाच पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्यावर होणार गंभीर परिणाम )
३. संतुलित आहार घ्या
काही लोक नाश्त्यासाठी संतुलित आहार घेत नाहीत. त्यात जास्त कार्बोहायड्रेट्स आणि कमी प्रथिने असतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे न्याहारीमध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीन नसलेल्या अशा गोष्टींचा समावेश करावा. म्हणजे गोड पदार्थ कमी आणि प्रथिने जास्त.
४. फॅटयुक्त पदार्थांचे सेवन करा
मधुमेही रुग्णांना वाटते की, जर त्यांनी जास्त चरबीचे सेवन केले तर त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. खूप जास्त फॅट खाल्ल्याने अनेक समस्या येत असल्या तरी फॅट हे शरीरासाठीही महत्त्वाचे असते. शरीराला चरबीपासून जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के मिळतात, जी शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनीही आहारात चरबीचे सेवन करावे. तथापि, चरबीचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. नाश्त्यात तुम्ही अंडी, मासे आणि बदाम यांचा समावेश करू शकता.
वरिल प्रमाणे आपण महत्वाच्या टिप्स फॉलो केल्यास मधूमेहाचं प्रमाण कमी करता येईल. त्याचबरोबर मधूमेह नियंत्रणात ठेवता येईल. वरिल टिप्स आपल्यासाठी पूरक आहे. मात्र, तरीही आपण या संदर्भात एकदा आहार तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.