तुमची दृष्टी आता केवळ दहा टक्केच शिल्लक आहे, डॉक्टरांचे हे वाक्य साठीच्या जोशीकाकांना धक्का देऊन गेले. एवढी वर्षे मधुमेह असूनही रेटिनाची तपासणी का केली नाही.. डॉक्टरांच्या या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. मधुमेह असलेल्या शेकडो लोकांची अवस्था जोशीकाकांसारखी होऊ शकते. यासाठी मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वर्षांतून एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांची त्यातही रेटिना, काचबिंदू, मोतीबिंदूची तपासणी करणे आवश्यक आहे. यातील रेटिनाचा आजार हा सर्वात धोकादायक आहे, कारण तो फसवा आहे. डोळ्याच्या आतील पडद्यावरील रक्तवाहिन्या बंद पडतात. रक्तवाहिन्या फुटतात आणि आतील पडदा सुटल्यामुळे अंधत्व येते. बऱ्याच वेळा दृष्टी जाईपर्यंत नेमका अंदाज येत नाही.
भारतातील मधुमेहीपैकी ३५ टक्के लोकांना रेटिनाचा त्रास उद्भवू शकतो. डोळ्याच्या आतील पडद्यावरील रक्तवाहिन्या फुटून रक्त पडद्यावर जमा होते. यातूनच पुढे रेटिनल डिटॅटमेंट (पडदा सुटणे) झाल्यास अंधत्व येते. रेटिना तसेच काचबिंदूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे हिंदुजा व जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यविशारद डॉ. प्रीतम सामंत यांनी सांगितले. आज एकटय़ा जे. जे. रुग्णालयात रेटिनावरील लेझरच्या दोनशे शस्त्रक्रिया महिन्याकाठी केल्या जातात, तर डोळ्यातील हॅमरेट व पडदा निसण्याच्या पन्नास शस्त्रक्रिया होतात. मधुमेहामुळे रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. तसेच जागोजागी रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. यातून रेटिनाचा पडदा ओढला जाऊन रेटिनल टिटॅचमेंट (पडदा सुटणे) होऊन अंधत्व येते. डायबिटिक रेटिनोपथीवर लेझर उपचार महत्त्वाचे असून यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे डॉ. प्रीतम सामंत यांनी सांगितले. भारत ही आगामी काळात मधुमेहाची राजधानी बनेल असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. सुमारे सहा कोटी लोकांना मधुमेह असून यातील वीस टक्के म्हणजे जवळपास दीड कोटी लोकांना डायबिटिक रेटिनोपथीचा त्रास आहे. मात्र यातील फारच थोडय़ांना आपल्या आजाराची कल्पना असल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. यातील पन्नास लाख लोकांनी वेळीच उपचार सुरू केले नाहीत तर त्यांना अंधत्व येण्याचा धोका असल्याचे डॉ. लहाने यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असून त्यासाठी रेटिनासह आवश्यक त्या डोळ्याच्या सर्व चाचण्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचे आहे.