मधुमेह म्हटलं की गोड खाऊ नका, ही फळं नको, भात नको अशा सूचना घरातील सगळेजण त्या व्यक्तीला वारंवार देत असतात. आता काय खाऊ नका हे तर आपल्याला माहिती असतं. पण काय खाल्लं तर हा मधुमेह आटोक्यात राहू शकतो हे मात्र कोणी सांगत नाही. तरुणपणात मधुमेह झाला असेल तर काळजी घेणे गरजेचे आहेच. पण त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. सध्या आरोग्याच्या सगळ्याच गोष्टींबाबत जागरुकता वाढल्याने त्याचा डाएट, उपचारपद्धती, व्यायाम यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. आहारतज्ज्ञ म्हणून येणाऱ्या तरुण रुग्णांची संख्याही वाढत आहे. काय आहेत नेमके उपाय पाहूयात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. मधुमेहाच्या गोळ्या चालू असल्यास त्या गोळीचे प्रमाण आहार पालनाने कमी होते. सतत रक्तातील साखर कमी जास्त होण्याचा त्रास देखील आहारतज्ज्ञाने दिलेल्या उपचारपद्धतीने कमी होऊ शकतो. मधुमेहीच्या पोटावरील चरबीचे प्रमाण तपासून पुढील त्रासांचा अंदाज घेतला जातो.

२. मधुमेह असल्यावर अनेक पदार्थ रोज खायलाच पाहिजेत असे असतात. असे असतात की जे रोज खायलाच हवेत. उदा. प्रथिने भरपूर घ्यायला हवीत. किंवा चुरमुरे, लाह्या, राजगिरा यांसारखे पदार्थ खाल्ल्यास पोटही भरते आणि ते आरोग्यास त्रासदायकही नसतात. याशिवाय तणावमुक्त राहिल्यानेही खूप फायदा होतो.

ताप आलाय? मग ‘हे’ उपाय करा

३. मधुमेह असताना वेळा पाळणे खूप महत्वाचे आहे. Type 2 प्रकारचा मधुमेह असल्यास आपण उत्तम आहारपालन, तणावमुक्त जीवन अणि योग्य व्यायाम यांनी मधुमेह बराच नियंत्रणात आणू शकतो. गरज आहे ते नक्की काय खावं, आपल्या प्रकृतीला नेमकं काय योग्य असेल हे समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या सवयी बदलण्याची. रोजच्या खाण्यात व सवयीमध्ये एक लहान बदल केल्यानेही त्याचा तब्येत चांगली राहण्यास फायदा होतो.

४. दिवसभरातल्या नेहमीच्या जेवणात धान्य असावीत. यात सगळी धान्य चालू शकतात. त्यातल्या त्यात गहू, बाजरी उत्तम. नाचणी ज्वारी मुळे थोडी साखर वाढू शकते. असे असले तरी त्याबरोबर कोबी, गाजर किंवा पालेभाज्या खाल्या तर आजिबात साखर वाढत नाही. भाताच्या बाबतीतही हेच लागू होते. नुसता वरण भात खाण्यापेक्षा त्याबरोबर पालेभाज्या आणि सॅलाड असेल तर तो भात खाल्लेला चालू शकतो. उदा. भात शिजवताना त्यात मोडाचे सालीसकट मूग आणि कोबी, गाजर घातले व पालेभाजी बरोबर तो खाल्ला तर भात रोज सुद्धा खाऊ शकता.

झोप पूर्ण होत नाहीये? हे उपाय करा

५. ओट्स अतिशय उत्तम असून मैदा टाळावाच. याचबरोबर जुना बटाटा, मध हे पदार्थही मधुमेहींसाठी चांगले नसतात. सर्व डाळी व कडधान्य खावीत. रोजच्या आहारात किमान ३ वेळा तरी डाळ किंवा कडधान्य किंवा अंड्याचे बलक वगळून पांढरा भाग खावा. याचा मधुमेहासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो.

६. चरबीयुक्त पदार्थ म्हणजेच बटर, साय, तूप, लोणी, चीज हे पदार्थ टाळलेले जास्त चांगले. किंवा खाल्ले तरीही अतिशय कमी प्रमाणात खावे. तेलाचा अतिरेकी वापर टाळावा. तळलेल्या पदार्थांपेक्षा बेक केलेले, ग्रील केलेले पदार्थ उत्तम. दाणे, तीळ, बदाम, अक्रोड यांच्या तेलापेक्षा ते नुसते खाणे जास्त चांगले.

७. फळांचा वापर रोज करावा. यात अति गोड फळे टाळलेली चांगली. उदा. केळी, सीताफळ, पपई, आंबा ही फळे कमी प्रमाणात खाल्ली तर चांगली. रोजच्या आहारात सफरचंद, पेर, संत्र, मोसंबी, जांभूळ यांचा समावेश असल्यास चालेल.

८. गोड पदार्थ टाळावेत. साखर कोणत्यातरी पदार्थाचा भाग म्हणून चालू शकते. उदा. आपण भाजीत थोडा गूळ किवा साखर घालतो ते चालते. परंतु गोड पदार्थ टाळावेत. ज्यूस बिना साखरेचा घ्यावा. मधुमेही लोकांसाठी विशेष मिठाई बाजारात मिळते किंवा बिस्किटे मिळतात. परंतु याने मधुमेह बरा होत नाही. ते पदार्थ चालतात असे ठरवून त्याचा अतिरेकी वापर टाळणे फायद्याचेच.

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes in young age how to take care important tips