अतिशय कमी झोप घेणाऱ्या पुरुषांना मधुमेहाचा धोका अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

संशोधकांनी यासाठी ८०० जणांचा अभ्यास केला. पुरुषांची झोप आणि ग्लुकोज चयापचय यांच्यातील विशिष्ट संबंध त्यांना आढळून आला. कमी किंवा अधिक झोप घेणाऱ्यांचे शरीर इन्शुलिनला कमी प्रतिसाद देते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण घटते आणि भविष्यात मधुमेह होण्याचा धोका संभवतो, तसेच महिलांना अशी अडचण येत नसल्याची माहिती संशोधक फेमेक रटर्स यांनी स्पष्ट केले.

झोपेचा कालावधी आणि मधुमेहाचा धोका यासाठी संशोधकांनी ७८८ जणांचे परीक्षण केले. ३० ते ६० वर्षे या वयोगटातील पुरुषांमध्ये इन्शुलिनची संवेदनशीलता आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार यांचा संबंध येत असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. संशोधकांनी युरोपातील १४ देशांत १९ अभ्यास केंद्रे उघडून या विषयाचा अभ्यास केला. संशोधकांनी निवडलेल्या व्यक्तींमधील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी विशिष्ट मापकाचा संशोधकांनी वापर केला आहे, तसेच मधुमेहाचा धोका ओळखण्यासाठी आणखी एका यंत्राचा वापर करण्यात आला. या यंत्राद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण कसे बदलते याचे मोजमाप करणे सोपे ठरणारे होते. त्यानुसार कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जलदगतीने वाढून मधुमेह होतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)