What The Color Of Your Pee Means: शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मल- मूत्र आवश्यक असते. शाळेपासून आपण या गोष्टी शिकलो आहोत. पण अनेकदा मल व मूत्रातील काही बदल आपल्याला चकित करू शकतात. यातील एक बदल म्हणजे रंग. तुम्हाला माहित आहे का, शरीरातून बाहेर टाकले जाणारे मूत्र हे अक्षरशः इंद्रधनुष्याच्या सर्व रंगांमध्ये काही वेळा दिसू शकते. प्रथिने आणि स्नायू (युरिया आणि क्रिएटिनिनच्या स्वरूपात) तसेच लाल रक्तपेशींच्या विघटनातून लघवीचा रंग बदलू शकतो. याशिवाय शरीराला मिळत असणारी जीवनसत्त्वे, औषधे आणि आपल्या आहारातील काही घटक यांचा सुद्धा लघवीच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. लघवीचे रंग नेमके कशामुळे बदलतात व त्यातून शरीर आपल्याला काय संकेत देऊ पाहतं हे आता आपण जाणून घेऊया..

लघवीचे रंग, त्याचे कारण व अर्थ

लाल

लाल मूत्र सामान्यतः रक्तस्त्राव दर्शवते. मूत्रपिंडापासून मूत्राशय आणि प्रोस्टेट ग्रंथी आणि त्यांना जोडणाऱ्या सर्व नसांमधून कुठूनही मूत्रमार्गात जर एखाद्या स्थितीमुळे रक्तस्त्राव होत असेल तर लघवीचा रंग लाल दिसू शकतो. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास, मूत्र इतके लाल गडद रंगाचे होऊ शकते की ते रेड वाइनसारखे दिसते. किडनी स्टोन पासून कर्करोगापर्यंत, स्ट्रोक आणि मूत्रमार्गाच्या संसर्गापर्यंत अनेक परिस्थितींमुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.तर काही वेळा जास्त प्रमाणात बीटरूट खाल्ल्याने सुद्धा लाल लघवी होऊ शकते. यातलाच एक अन्य प्रकार म्हणजे थोडा हलका लाल किंवा गुलाबी रंग लघवीत दिसून येणे.

केशरी आणि पिवळा

अर्थात, आपल्याला माहित आहे की मूत्राचा रंग त्याच्या सामान्य स्वरुपात पिवळ्या रंगाच्या छटांमध्ये असतो. आपण किती हायड्रेटेड आहात पिवळ्या रंगाची छटा ठरते. डिहायड्रेशनमुळे गडद-पिवळ्या रंगाची लघवी बनते, तर काहीवेळा केशरी पिवळ्या रंगाची लघवी होते. आवण आवश्यक प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन करत असल्यास फिकट पिवळा असा लघवीचा रंग होतो. यूरोबिलिन हे संयुग मूत्राला पिवळा रंग देतात. जुन्या लाल पेशींच्या विघटनातुन हे संयुग तयार होते. रक्ताभिसरणातून या पेशी बाहेर टाकण्यासाठी शरीर ही प्रक्रिया करते, आणि मग लघवीच्या स्वरूपात या पेशी बाहेर फेकल्या जातात.

याशिवाय या प्रक्रियेमुळे बिलीरुबिन नावाचे संयुग सुद्धा तयार होते. जे अंशतः मूत्रमार्गे आणि अंशतः आतड्यांद्वारे उत्सर्जित होते. यकृताद्वारे पित्त तयार करण्यासाठी या संयुगांचा वापर होतो. हे पित्त चरबीचे विघटन आणि अन्नाचे पचन करण्यासाठी महत्वाचे ठरते. वापरानंतर हे उर्वरित पित्त आतड्यात स्रवते आणि विष्ठेमध्ये मिसळून जाते, पित्तामधील ही संयुगे मलाला विशिष्ट तपकिरी रंग देतात.

जेव्हा एखाद्या विशिष्ट आजारामुळे पित्त आतड्यात सोडले जाऊ शकत नाही तेव्हा बिलीरुबिन पुन्हा रक्तप्रवाहात शोषले जाते आणि नंतर मूत्रमार्गे उत्सर्जित होते. यामुळे काही वेळा लघवीचा रंग हा अत्यंत गडद नारंगी किंवा तपकिरी दिसू शकतो. बिलीरुबिनचे प्रमाण खूपच वाढल्यास त्वचा देखील पिवळी दिसू लागते, याला कावीळ असेही म्हणतात. दरम्यन काही प्रतिजैविक औषधे देखील लघवीचा रंग नारंगी करू शकतात.

हिरवा आणि निळा

हिरवा आणि निळा रंग लघवीला येणे हे थोडं दुर्मिळच आहे. त्यामुळे आधी एकदा याची खात्री करून घ्या की आपल्याला दिसणारा रंग हा टॉयलेटच्या फ्लशमधील पाण्याचा नाही. तुमच्या शरीरात जर हिरवं किंवा निळं मूत्र तयार होत असेल तर त्याचं कारण तुमचा आहारही असू शकतो. रंग सोडणारे पदार्थ जसे की हिरव्या भाज्या, हर्ब्स (शतावरी), निळ्या रंगांचे पदार्थ किंवा पेय भरपूर प्रमाणात आपल्या पोटात गेले असेल तर लघवीला असा रंग येऊ शकतो.

काही सूक्ष्मजंतू हिरवट रंगाची संयुगेही बनवू शकतात. स्यूडोमोनास एरुगिनोसा (त्याच्या वर्डिग्रीस रंगानुसार नाव) हा जीवाणू हिरवा-निळा पायोसायनिन्स तयार करतो. शिवाय मूत्रमार्गाच्या संसर्गाचे हे एक दुर्मिळ कारण आहे – जे लघवी करताना बऱ्याचदा जळजळ किंवा डंख मारल्यासारख्या संवेदना निर्माण करते.

इंडिगो किंवा जांभळा

लघवीचा इंडिगो किंवा जांभळा रंग सुद्धा दुर्मिळ आहे. याच्या संभाव्य कारणांपैकी एक म्हणजे पोर्फेरिया (ज्याचा अर्थ जांभळा आहे) याचा मज्जासंस्थेवर व त्वचेवर थेट परिणाम होतो. ‘Purple Urine Bag’ सिंड्रोम सुद्धा यामागे कारण असू शकतो. शरीरात लघवीचा निचरा करण्यासाठी सक्रिय असणारे जिवाणू हा रंग तयार करतात व त्यामुळे मूत्र जांभळे होते.

हे ही वाचा<< रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा

रंगहीन लघवीचा अर्थ काय?

याशिवाय काही वेळा अत्यंत गडद काळा रंग किंवा तपकिरी रंग सुद्धा लघवीला प्राप्त होतो. डॉक्टरांच्या मते हा रंग अक्षरशः कोक प्रमाणे दिसू शकते. मायोग्लोबिन नावाच्या संयुगात स्नायूंच्या विघटनामुळे हे होण्याची शक्यता असते. अतिश्रम किंवा औषधांमुळे अशी स्थिती उद्भवते. रंग व त्याची कारणे वाचून बहुधा आपल्याला असे वाटत असेल की याचा अर्थ स्पष्ट, रंगहीन लघवी हे चांगल्या आरोग्याचे लक्षण असू शकते. पण खरं सांगायचं तर यात पूर्ण तथ्य नाही. गडद पिवळी लघवी न होणे हे उत्तम असले तरी रंगहीन लघवी देखील मधुमेह किंवा पॅथॉलॉजिकल ओव्हरड्रिंकिंगचे संकेत देऊ शकते.

लघवीच्या रंगावरून आपल्याला संभ्रम असल्यास तुम्हीही तुमच्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.