लग्न या पवित्र बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. नाते आयुष्यभर जपण्याचे एकमेकांना वचन देतात. नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, समजूतदारपणा असेल तर हे नाते दीर्घकाळ टिकते.
लग्नाच्या सुरुवातीला नात्यात असणारा गोडवा हळूहळू कमी होऊ शकतो. अनेकदा गोष्टी इतक्या बिघडतात की, नाते तुटण्याची वेळ येते आणि घटस्फोट घ्यावा लागतो. आज आपण जाणून घेऊ घटस्फोटाची काही कारणे :
प्रेम कमी होणे
नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेम संपले की, गोडवा संपतो. त्यामुळे नात्यात प्रेम असणे आवश्यक आहे. एकमेकांना पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे अनेक गैरसमज होऊ शकतात; ज्यामुळे नाते तुटू शकते. त्याशिवाय जोडीदाराला गृहीत धरणे किंवा एकतर्फी प्रेमामुळेसुद्धा घटस्फोट घेण्याची वेळ येऊ शकते.
विवाहबाह्य संबंध
विवाहबाह्य संबंध घटस्फोटाच्या प्रमुख कारणांपैकी एक असू शकते. कोणत्याही व्यक्तीची अपेक्षा असते की, त्याच्या जोडीदाराने त्याच्याबरोबर प्रामाणिक राहावे; पण जर जोडीदार फसवणूक करून विवाहबाह्य संबंध
ठेवत असेल, तर नाते तुटण्याच्या मार्गावर असते. नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात.
हेही वाचा : तुमची जोडी राम-सीतेसारखी आहे का? या गोष्टींवरून लगेच ओळखा…
एकमेकांचा आदर न करणे
कोणत्याही व्यक्तीला त्याचा स्वाभिमान अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांविषयी आदर असणे अत्यंत गरजेचे आहे. एकमेकांच्या विचारांचा सन्मान न करणे, तुच्छतेने वागणे, इत्यादी कारणांमुळे नाते बिघडू शकते. नात्यात एकमेकांविषयी आदर असेल, तरच नाते दीर्घकाळ टिकू शकते.
दोषारोप करणे
जर तुमच्या जोडीदाराकडून एखादी मोठी चूक झाली असेल, तर त्यांना दोष देऊ नका. त्यांना प्रेमाने समजून सांगा. एकमेकांवर दोषारोप केल्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी एकमेकांना समजून घेणे खूप जास्त गरजेचे आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)