दिवाळीत गोड पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळला आहात. तेव्हा तिखट, चटपटीत असा पदार्थ तुम्हाला घराच्या घरी आणि तोही झटपट ट्राय करायचा असेल तर ‘मिरची वडा चाट’ एक उत्तम पर्याय आहे. खास दिवळीनिमित्त ‘खानदानी राजधानी’चे शेफ महाराज जोधाराम चौधरी यांनी ही पाककृती तयार केली आहे. करायला सोपा आणि चविष्ट असा हा ‘मिरची वडा चाट’ कसा तयार करायचा याची पाककृती पाहू
साहित्य :
– पाच ते सहा मोठ्या मिरच्या
– एक वाटी उकडून मॅश केलेले बटाटे
– एक मोठा चमचा लाल तिखट
– अर्धा टीस्पून धणे पावडर
– अर्धा टीस्पून जीरे पावडर
– अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर
– १ कप बेसन
– चिमुटभर हळद
– पाव टीस्पून ओवा
– चवीपप्रमाणे चाट मसला
– आंबड, गोड, तिखट चटणी
– तळण्यासाठी तेल
पाककृती :
कढईत एक चमचा तेल गरम करून घ्यावे. त्यात लाल तिखट, धणे- जीरे पावडर, गरम मसाला टाकावा. यात मॅश केलेले बटाटे टाकावे. चवीनुसार मीठ टाकावं. मंद आचेवर हे मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवावं. मिरचीला एक उभी चीर देऊन त्यातील बिया काढून घ्यावा. मिरचीमध्ये थंड झालेलं बटाट्याचं मिश्रण भरून घ्यावं.
बेसनमध्ये चिमुटभर हळद, ओवा, मीठ, लाल तिखट घालून पातळ मिश्रण तयार करावं. यात मिरची बुडवून गरम तेलात डिप फ्राय करून घ्याव्यात. त्यानंतर एका सर्व्हिंग डिशमध्ये या मिरच्या काढून घ्याव्यात. मिरचीवर चवीप्रमाणे चाट मसाला, आंबड , गोड तिखट चटणी टाकून मिरची वडा चाट सर्व्ह करावा.